प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी येथे शेतकऱयांनी सामुहीक गटशेती केलेली आहे. पण त्याबाबत शासकीय लाभाचा शेतकऱयांना तर शेतकऱयांनी केलेल्या या शेतीची येथील प्रशासनाला देखील कल्पना नाही. येथील गटशेतीचे अभियान जिल्हय़ात सुरू करून त्याचे मॉडेल तयार करण्याच्या सूचना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकाऱयांना दिल्या आहेत.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या रत्नागिरी तालुका दौरा शनिवारी झाला. त्यावेळी तालुक्यातील चिंचखरीतील भात शेतीच्या नुकसानीची पहाणी त्यांनी केली. यावेळी प्रवीण दरेकर यांनी येथील सामूहिक शेतीचे कौतुक केले. चिंचखरीतील ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहून कृषीसाठी विशेष योजना भाजपच्या माध्यमातून आखण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्याबाबत मॉडेल तयार करण्याच्या सूचना येथील जिल्हाधिकाऱयांना त्यांनी केल्या. जिल्हाधिकाऱयांनीही त्यासाठी मंजूरी दिल्याचे दरेकर यांनी सांगितले.
परतीच्या पावसामुळे ठिकठिकाणी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतजमिन खरवडून वाहून गेली. त्याठिकाणी धुपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात यावेत. शेतकऱयांनी घेतलेली पीककर्ज देखील माफ केली जावीत अशा सूचना दरेकर यांनी केल्या आहेत. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे प्रश्न आणि बँक अधिकाऱयांची एकत्रित बैठक घेऊन तत्काळ अडचणी सोडवू या असे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, आमदार प्रसाद लाड, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, हेही उपस्थित होते.