ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्ण संख्येत घट होत असतानाच डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. बुधवारी राज्यात 20 नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील डेल्टा प्लस बाधितांची संख्या आता 65 वर पोहचली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नव्याने आढळलेल्या 20 रुग्णांपैकी 7 जण मुंबईतील, पुणे 3, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर येथे प्रत्येकी 2, चंद्रपूर आणि अकोला येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून राज्यात करोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरूपात करण्यात येत आहे. या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात ,80 टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचे दिसून येते आहे. या सर्वेक्षणातून राज्यात आतापर्यंत 65 डेल्टा प्लस व्हेरीयंटचे रुग्ण आढळून आले आहेत.
65 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 33 स्त्रिया आहेत. सर्वाधिक 33 डेल्टा प्लस रुग्ण 19 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल 45 ते 60 वर्षे वयोगटातील 17 रुग्ण आहेत. या मध्ये 18 वर्षांखालील 7 बालके असून 60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत.
राज्यातील डेल्टा प्लसच्या 65 रुग्णांपैकी ज्या रुग्णांची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील एक मृत्यू वगळता डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरूप सौम्य ते मध्यम स्वरूपाचे आहे. विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोविड अनुरूप वर्तनाचा अंगिकार करणे गरजेचे आहे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.