ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 381 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर तीन जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 11 हजार 773 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 124 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 11,773 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 1221 पोलीस अधिकारी आणि 10,552 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 9 हजार 416 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 932 पोलीस अधिकारी आणि 8484 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 2233 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 278 पोलीस अधिकारी आणि 1955 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 124 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 पोलीस ऑफिसर आणि 113 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.