ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, ही बाब आता देशासाठी अधिकच चिंताजनक बनली आहे. त्यातच गुरुवारी कोरोनाकाळातील नवा दैनंदिन उच्चांक नोंदवण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संकट आणखी गडद होत असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वी बुधवारी (दि.7) देशात बाधितांच्या संख्येने सव्वा लाखांचा टप्पा पार करत विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली. दरम्यान, देशात मागील 24 तासात 1 लाख 31 हजार 968 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 780 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 30 लाख 60 हजार 542 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 67 हजार 642 एवढी आहे.
गुरुवारी 61,899 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 19 लाख 13 हजार 292 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 9 लाख 79 हजार 708 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 9 कोटी 43 लाख 34 हजार 262 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 25 कोटी 40 लाख 41 हजार 584 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 13 लाख 64 हजार 205 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.08) करण्यात आल्या.