किरकोळ कारणावरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद, आरोपींवर कडक कारवाई करा: अमोल वेटम
सांगली/प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून सांगली मधील चिंतामण कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेज कॅन्टीन समोर दि.१८ रोजी सक्षम मोरे या १७ वर्षाच्या विद्यार्थ्यास किरकोळ कारणावरून दहा ते पंधरा अनोळखी विद्यार्थ्यांनी काठीने दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान संहिती कलम ३२४,१४३,१४७,१४९,३२३,५०४,५०६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी सक्षम मोरे यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत. कॉलेजवर होणाऱ्या हाणामारीमुळे चिंतामण कॉमर्स कॉलेज की गुंडांचा अड्डा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असताना जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाला अशा गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांनी केराची टोपली दाखवत कायदा हातात घेतलेला आहे. यामुळे सदर अनोळखी गुंड प्रवूत्तीच्या विद्यार्थ्याना तत्काळ अटक करण्यात यावी, प्राचार्य यांनी सदर गुंड प्रवूत्तीच्या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजमधून काढून टाकावे, पोलीस ठाण्याच्या एक किलोमीटर अंतरात ही घटना घडली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस अनिल ऐनापुरे करत आहेत, अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिली.