कोल्हापूर शहरात सर्वाधिक 142 रुग्ण, परजिल्हा, राज्यातून आलेले सहा पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने कोल्हापुरकरांची चिंता वाढवली आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये तब्बल 223 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. रविवारी वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे नागरिक आवक झाले. दिवसभरात 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सक्रीय रुग्णसंख्या 791 इतकी झाली आहे.
जिल्हय़ात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच निघाला आहे. दिवसकाठी वीस पंचवीस असणारी रुग्णसंख्या पन्नास, सत्तर, शंभर दिडशे अशी वाढत रविवारी ती तब्बल 223 वर गेली. शनिवारची 136 असणारी संख्या रविवारी एकदमच 223 वर गेल्याने नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
रविवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सर्वाधिक 142 रुग्ण कोल्हापूर शहरात मिळून आले आहेत. त्यानंतर करवीर तालुका आणि इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रात प्रत्येकी 16 रुग्ण आढळले. चंदगड तालुका, मलकापूर नगरपालिका क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्ण मिळाला. भुदरगड, राधानगरी तालुका 5, गडहिंग्लज, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात 4, हातकणंगले तालुक्यात 8 रुग्ण मिळाले. गडहिंग्लज, हुपरी आणि मलकापूर नगरपालिका क्षेत्रात अनुक्रमे पाच, दोन आणि एक रुग्ण मिळून आला.
परजिल्हा,राज्यातील रग्णांमध्ये वाढ
अहवालामध्ये परजिल्हा आणि राज्यातून आलेल्या 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कर्नाटक, तामिळनाडू येथून आलेल्या रुग्णांचा समावेश आहे.