ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. लागोपाठ चौथ्या दिवशी कोरोना बाधितांचा आकडा हजार पेक्षा अधिकने वाढला आहे. मागील चोवीस तासात 1295 नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. जे आता पर्यंतचे सर्वाधिक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत रविवारी एका दिवसात 1295 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19 हजार 844 वर पोहचली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 10,089 रुग्ण हे लॉक डाऊन 4.0 मध्ये आढळले आहेत.
तर आता पर्यंत 8,478 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दिल्लीत सध्या 10,893 रुग्ण ॲक्टिव आहेत. तर कोरोनामुळे आता पर्यंत 473 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, 10,893 ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 158 रुग्ण हे कोविड हेल्थ सेंटरमध्ये आणि 624 रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दिल्लीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 45 टक्के असून दिवसेंदिवस ते वाढत आहे.