कारवार जिल्हय़ातील मळगी येथील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
काजू खरेदी करण्यासाठी गेलेल्या चिकोडी तालुक्यातील व्यापाऱयाची 28 लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. ही घटना मळगी (ता. मुंदगोड, जि. कारवार) येथे घडली. या घटनेची नोंद शिरसी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, चिकोडी येथील शिवनगौडा पाटील आणि त्यांचे मित्र अस्लम नदाफ हे काजू खरेदी करण्यासाठी म्हणून मुंदगोड तालुक्यातील मळगी गावात गेले होते. त्याठिकाणी एका टोळीने त्यांना मळगी गावातील धरणाजवळ काजू दाखवण्यासाठी म्हणून नेण्यात आले. मात्र, काजू न दाखवता 28 लाख रुपये असलेली बॅग घेऊन या टोळीने पोबारा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरसीचे डीएसपी रवी नायक त्याचबरोबर मुंदगोडचे पोलीस निरीक्षक प्रभूगौडा यांनी घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञांसह तपास केला. मात्र या टोळीतील एकाचाही शोध लागला नाही.
सदर व्यापारी हा काजू खरेदीसाठी गेला होता की कमी किमतीतील सोने खरेदी करण्यासाठी गेला होता याबाबतचे तर्कवितर्क सुरू असून मळगी येथून त्यांच्याशी कोणी संपर्क साधला होता याबाबत पोलिसांनी तपास कार्य हाती घेतले आहे.