कर्मचाऱयाला कोरोनाची लागण : 48 तासांसाठी रुग्णालय राहणार सीलडाऊन
वार्ताहर/ चिकोडी
गोरगरिबांच्या आजारावर मोफत इलाज उपलब्ध असणारे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱया चिकोडी शहरातील सार्वजनिक रुग्णालयातील एका कर्मचाऱयाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे सदर रुग्णालय 48 तासासाठी शनिवारपासून सीलडाऊन करण्यात आले आहे.
चिकोडीच्या सार्वजनिक इस्पितळाच्या सुरक्षा क्लिनिक विभागात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या मूळच्या गोकाक तालुक्यातील 40 वर्षीय कर्मचाऱयाचा 26 जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता. त्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सदर इस्पितळ सीलडाऊन करण्यात आले असले तरी सदर कर्मचारी इस्पितळात कार्यरतच असल्याने खळबळ माजली आहे. तथापि इस्पितळ प्रशासनाकडून मात्र माहिती देण्याचे टाळण्यात येत आहे.
प्राथमिक संपर्कामुळे पॉझिटिव्ह
मिळालेल्या माहितीनुसार इस्पितळातील हा कर्मचारी शहरातील प्रभूवाडी येथील एका घरात भाडय़ाने राहत होता. त्याच्या शेजारी एक व्यक्ती वास्तव्यास होती. भाडे तत्त्वावर वास्तव्यास असल्याने सदर ठिकाणी कॉमन बाथरुम होते. यापैकी एकाचा अहवाल याआधी पॉझिटिव्ह आला होता. सदर व्यक्तीच्या प्राथमिक संपर्कातील व्यक्ती म्हणून या कर्मचाऱयाचा स्वॅब घेण्यात आला होता. या कर्मचाऱयामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणेच नव्हती. त्यामुळे तो आजपर्यंत सेवेतही होता. शिवाय आपल्या गावीही जाऊन आल्याचे समजते. इस्पितळातील इतर कोणकोणत्या व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्या, किती रुग्णांना त्याने समुपदेशन करताना संपर्क केला, याचे गणित पाहता यानंतर किती जणांचे स्वॅब तपासणीसाठी घ्यावे लागणार याविषयी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
सर्व कक्ष बंद
सरकारी इस्पितळातील कोविड कक्ष वगळून इतर सर्व कक्ष बंद करण्यात आले आहेत. यामुळे नेहमी गजबलेल्या सार्वजनिक इस्पितळाचा परिसर ओस पडला आहे. उपलब्ध माहितीनुसार केवळ अतिदक्षता विभागात प्रथमोपचार करून रुग्णांना बेळगावच्या सार्वजनिक इस्पितळास पाठविण्यात येत आहे. चिकोडीतील या सार्वजनिक इस्पितळात सुमारे 150 कर्मचारी कार्यरत असून यापैकी कितीजण सुरक्षा क्लिनिकमधील त्या कर्मचाऱयांच्या संपर्कात आले आहेत, याची चौकशी होणे गरजेचे असून त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा चिकोडीतील सार्वजनिक इस्पितळ कोरोनाचे उत्पादन केंद्र बनेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.