साडेचार लाखांचे नुकसान : अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले : नागरिकांचेही सहकार्य
प्रतिनिधी /चिकोडी
शहरातील सोमवारपेठेमधील एसबीआय बँकेसमोर असलेल्या महाकोटीश्वर ऑनलाईन सेंटर व जनरल स्टोअर दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली. या घटनेत दुकानातील साडेचार लाखांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. सदर घटना मंगळवारी रात्री 10 वाजता घडली. चिकोडी, निपाणी येथील अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे आग आटोक्मयात आल्याने मोठी हानी टळली असून या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील हॉटेल दुर्गा भवन ते बसवेश्वर सर्कलदरम्यान संकेश्वर-जेवर्गी राज्य महामार्गावरील एसबीआय बँकेसमोर अमित मुसंडी यांचे ऑनलाईन सेंटर व जनरल स्टोअरचे दुकान आहे. मंगळवारी रात्री पाऊस झाल्याने परिसरातील व्यापाऱयांनी लवकर दुकाने बंद केली होती. रात्री 10 वाजता शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुकानाला आग लागली. दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडताच परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. पण, आगीने रौद्ररुप धारण केल्याने एका बंबामुळे आग आटोक्मयात येत नसल्याने नागरिकांनीही घरातून घागर, बादलीतून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निपाणी येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
या घटनेत दुकान व परिसरातील 20 लाखांच्या मालमत्तेची हानी होण्याची शक्मयता होती. पण, आग वेळीच आटोक्मयात आल्याने 15 लाखांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. आगीत दुकानातील झेरॉक्स मशीन, संगणक व इतर साहित्य असे एकूण साडेचार लाखांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.