शहरातील रहदारी पोलीस स्थानक नावालाच
प्रतिनिधी / चिकोडी
शहरातील वाहतुकीमध्ये दिवसाकाठी वाढ होत आहे. शहरातील रस्ता रुंदीकरणाचे काम रखडल्यामुळे शहरात पार्किंगची सोय नाही. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी दिवसाकाठी वाढतच चालली आहे. चिकोडी शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रहदारी पोलीस स्थानक स्थापन केले आहे. असे असले तरी शहरातील वाहतुकीची कोंडी कायम आहे. पार्किंगची सोय नसल्याने वाहने रस्त्यावरच लावण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे येथील वाहतुकीला शिस्त लागणार, कधी असा प्रश्न नागरिकांसमोर पडला आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू केलेल्या रहदारी पोलीस ठाण्यातील पोलीस सुरळीत वाहतूक सुरू करण्याऐवजी केवळ चौकाचौकात थांबून परराज्यातून येणारी वाहने अडवून दंडात्मक कारवाई करण्यात व्यग्र असतात. 2015 साली येथे रहदारी पोलीस ठाणे सुरू केले. परंतु, आवश्यक पदे भरलेली नाहीत. तरीही येथे कार्यरत असलेल्या पोलिसांना बंदोबस्त व इतर कारणासाठी इतरत्र पाठविण्यात येत असते. बोटावर मोजण्याइतके पोलीस कार्यरत असून ते केवळ बसस्थानक परिसर, अंकली खूट, बसवेश्वर सर्कल परिसरातच असतात.
प्रामुख्याने शहरातील केसी रोड ते नगरपरिषद दरम्यान रस्ता रुंद असला तरी जवळपास पार्किंगची सोय नसल्याने वाहने दुकाने, कार्यालयांसमोरच थांबविण्यात येतात. दोन्ही बाजूला दुकानांसमोर सुमारे 5 फुटांचा रस्ता हा वाहन पार्किंगसाठी वापरला जात आहे. परिणामी, शहरात रुंद रस्ता असला तरी वाहने थांबविल्यामुळे फार कमी रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होत आहे. नगरसभा कार्यालय ते अंकली खूटपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी 2015 साली नगरपरिषदेच्यावतीने प्रयत्नही करण्यात आले. रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविला होता. त्यासाठी 7.50 कोटीची भरपाई देण्याची गरज होती. त्यातील नगरपरिषदेने आपल्या वाटय़ाची रक्कम प्रांताधिकाऱयांकडे जमा केली होती. रस्ता रुंदीकरणास 50 टक्के नागरिकांनी प्रतिसाद दिला. पण भरपाई देण्यास शासनाने नकार दिल्याने रस्ता रुंदीकरण रखडले आहे.
या रस्त्यावर दुहेरी वाहतूक असल्याने वाहतुकीची कोंडी होत असते. पोलीसांनी अकंली खूटनजीक एकेरी वाहतूकीचा फलक लावला असला तरी दुहेरी वाहतूक सुरु असते. अरुंद असलेल्या रस्त्यावर दुतर्फा वाहने थांबविण्यात येत असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होते.
नाल्यावर स्लॅब घालून सोय पण वापर नाही
शहरातील निपाणी-मुधोळ राज्य महामार्ग, केसी रोड, अंकली खूट, बसवेश्वर सर्कल, डंबळ खूट, बसस्थानक अशा ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होत असते. बसवेश्वर सर्कल ते अंकली खुट ते नगरपरिषद रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्याची गरज आहे. शहरात पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच वाहने थांबवण्यात येतात. त्यामुळे वाहतुकीसाठी कमी रस्ता उपलब्ध होतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. चिकोडी नगरपरिषदेने जवळच नगरपरिषदेसमोरच असलेल्या नाल्यावर स्लॅब घालून तेथे कांही वाहनांच्या पार्किंगची सोय केली आहे. पण वाहन पार्किंग सक्तीचे न केल्यामुळे केसी रोडवरच वाहने थांबवली जातात. रस्त्यावरील वाहन पार्किंगचे प्रकार बंद करून नाल्यावर असलेल्या ठिकाणी सक्ती करुन वाहन पार्किंगची सोय केल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. चिकोडी शहराचा जिल्हय़ाच्या शहराप्रमाणे विस्तार होत असून कांही वर्षापूर्वी चिकोडी शहरात बायपास रस्ता निर्मितीसाठी मंजुरी देण्यात आल्याचे कांही लोकप्रतिनिधींनी माहिती दिली होती. पण राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तीत होत असल्याने ही जबाबदारी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी खबरदारी
शहरात जवळपास 50 हजार लोकवस्ती असून वाहनांची संख्याही वाढली आहे. रहदारी पोलिसांकडून वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होवू नये, याची खबरदारी घेण्यात येत आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होवू नये यासाठी आरेखन करण्यात आले आहे. सदर आरेखनामध्ये गाडे लावण्याची ताकीद करण्यात आली असल्याची माहिती चिकोडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुंदर रोगी, यांनी सांगितले.