उपनगराध्यक्षपदी संजय कवटगीमठ : मान्यवरांकडून पदाधिकाऱयांचा सत्कार
वार्ताहर/ चिकोडी
गेल्या दोन वर्षापासूनच्या प्रलंबित निवड प्रक्रियेला पूर्णविराम देत सोमवारी चिकोडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीचा मुहूर्त मिळाला. या नगरपरिषदेवर भाजपने आपला झेंडा रोवताना नगराध्यक्षपदी प्रवीण कांबळे तर उपनगराध्यक्षपदी संजय कवटगीमठ यांची निवड करण्यात आली. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार महांतेश कवटगीमठ, राज्य सौहार्द सहकारीचे उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार सुभाष संपगावी यांनी काम पाहिले.
प्रारंभी नगरसभेच्या सभागृहामध्ये निवडीची घोषणा झाली. त्यानंतर प्रांगणामध्ये बिनविरोध निवडीची घोषणा करून मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱयांचे स्वागत पेले. खासदार जोल्ले म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. आता चिकोडी नगरपरिषदेवरही भाजपची सत्ता आल्याने शहराचा विकास साधला जाणार असल्याचे सांगितले. आमदार कवटगीमठ म्हणाले, चिकोडी शहराचा परिपूर्ण विकास आम्ही करणार आहोत. विविध शासकीय योजनांचा फायदा शहरवासीयांना मिळवून देण्यासाठी नूतन पदाधिकारी कटिबद्ध असणार आहेत. मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाचे पालन करत आम्ही यापुढे विकासाचे राजकारण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नूतन नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपनगराध्यक्ष संजय कवटगीमठ, जगदीश कवटगीमठ यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, संजय आडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तरुण भारतचा अंदाज अचूक
चिकोडीची सत्ता कवटगीमठ यांच्याकडेच राहणार या मथळय़ातंर्गत 12 ऑक्टोबर रोजी तरुण भारतमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्षपदी प्रवीण कांबळे यांची निश्चिती वर्तविण्यात आली होती. सदर वृत्त अचूक ठरल्याची चर्चा निवड कार्यक्रमात होत तरुण भारतचे कौतुक करण्यात आले. एकंदरीत चिकोडी नगरपरिषदेवर कवटगीमठ यांच्या नेतृत्वात भाजपचा झेंडा रोवण्यात आला आहे. 13 संख्याबळासह कवटगीमठ बंधूंनी चिकोडीवर आपले वर्चस्व सिद्ध करत काँग्रेसला धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय गटात रंगली आहे.