प्रतिनिधी/ चिकोडी
शिकाऊ वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घरासमोर खेळत असलेल्या बालकाच्या अंगावरून गेल्याने चार वषीय बालक ठार झाल्याची घटना शहरातील प्रभुवाडी येथील मौलाली दर्ग्यानजीक शनिवारी दुपारी घडली. उदयकुमार मल्लप्पा बिरादर असे मृत बालकाचे नाव आहे.
मूळ विजापूर जिल्हय़ातील मुद्देबिहाळ तालुक्मयातील बिज्जूर गावचे रहिवासी असलेले मल्लप्पा बिरादर हे चिकोडी येथील कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात कर्मचारी आहेत. प्रभूवाडी येथे ते भाडय़ाच्या खोलीत राहतात. घरासमोर असलेल्या मौलाली दर्ग्यासमोर उदयकुमार हा खेळत होता. याचवेळी शिकावू कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खेळत असलेल्या उदयकुमार या बालकावरून कार गेली. तसेच एक दुचाकी वाहनाला व झाडाला कारची धडक बसली. या अपघातात उदयकुमार बिरादर याचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच कार चालक अरविंद सिद्राम बुरली (रा. केरूर, जि. बागलकोट) हा फरारी झाला. घटनास्थळी चिकोडीचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, संचारी पोलीस ठाण्याचे ठाणाधिकारी एम. ए. कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद चिकोडी पोलीस स्थानकात झाली आहे.