खासदार आण्णासाहेब जोल्ले यांची माहिती
वार्ताहर/ पट्टणकुडी
चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून या विभागामधील सुमारे 156.060 कि. मी. रस्ते विकासासाठी 120 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या विभागातील रस्त्यांचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी केले. येथील गौराई माळ ते खडकलाट पर्यंतच्या रस्ताकामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
रविवारी सकाळी हा उद्घाटन सोहळा पार पडला. प्रारंभी खासदार आण्णासाहेब जोल्ले, माजी ग्रा. पं. सदस्य सुरेंद्र गौराई, अभिषेक पाटील, सोमशेखर सरवडे, विजय अकोळते यांनी श्रीफळ वाढविले. तर ज्ये÷ नागरिक जंबू लंगोटे, विजय दाईंगडे, रोहन कागे, चंद्रकांत घोडगिरे व रावसाहेब चंदुगडे आदी मान्यवरांनी कुदळ मारून या रस्ताकामाचा शुभारंभ केला.
याप्रसंगी बोलताना खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, चिकोडी लोकसभा मतदारसंघातील अनेक रस्त्यांची वाताहत झालेली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने अशा ठिकाणच्या रस्ताकामाची मागणी प्रवाशांतून होत होती. ही मागणी व गरज लक्षात घेऊन लोकसभा विभागातील निपाणी, कागवाड, हुक्केरी व जमखंडी या विभागामध्ये रस्त्यांच्या योग्य दर्जातील डांबरीकरणासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून केंद्र शासनाकडून 60 टक्के आणि राज्य शासनाकडून 40 टक्के असा सुमारे 120 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
86 कोटी रुपयांच्या निधीतून कामांना प्रारंभ
सध्या यापैकी 86 कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काम सुरू आहे. यामध्ये निपाणी-चिकोडी राज्य मार्गावरील महात तंबाखू गोडावूनपासून ते गवाण व अशा विविध रस्ते कामासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने पट्टणकुडीतील गौराई माळपासून ते चिखलव्हाळमार्गे खडकलाट या 7.120 किलो मीटर अंतराच्या रस्ताकामासाठी 4 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. तसेच या मार्गावर गरजेच्या ठिकाणी 4 लहान पूलही उभारण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रस्ताकाम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षापर्यंत या रस्त्यांची देखभाल करण्याचीही व्यवस्था केली असल्याचेही खासदार जोल्ले यांनी सांगितले.
याप्रसंगी गावकामगार किरण पाटील, आण्णासाहेब ठाणे, इरय्या जंगम, अनिकांत पाटील, मोहन गुमठाण्णावर, सोमराज नाईक, सचिन देशमाने, एस. ए. एरूळे, सुकुमार कागे, जयकुमार ठाणे, के. बी. झुपरे, बंडू गौराई, धन्यकुमार कागे, तात्यासाहेब पोमाई, मनोज डुग्गे, उत्तम नाईक, सुशांत भिकन्नावर, कंत्राटदार आर. एस. पाटील, सहाय्यक कार्यकारी अधिकारी एस. पी. वाल्यापूरकर, अजित पाटील, सागर शिंदे, विजय इंगळे, अमर सटाले, सुशांत इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.