प्रतिनिधी/ चिकोडी
चिकोडी लोकसभा मतदार संघातील सर्व शिक्षक कर्मचाऱयांना चिकोडी येथील केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे चिकोडी रुग्णालयात मोफत कोरोना निर्बंधक लसीकरणाची सोय केली असून शिक्षकांनी पहिल्या व दुसऱया लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी केले आहे.
आगामी काळात राज्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षेसाठी नियुक्त सर्व शिक्षक व कर्मचाऱयांनी कोरोना निर्बंधक लस घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. शिक्षकांना जवळच्या सरकारी रुग्णालयात लसी उपलब्ध न झाल्यास त्यांनी अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीने केएलई रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेतून लसीकरण करुन घ्यावे. रुग्णालयात शिक्षकांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली असल्याने तातडीने लस देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.