दोन महिन्यांपूर्वी परतलेली महिला बाधित पांगिरे-बी येथील बाळंतिणीला लागण
वार्ताहर/ तवंदी :
पांगिरे-बी येथील 25 वर्षीय बाळिंतीणला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर महिला 17 मे रोजी म्हणजे साधारणतः दोन महिन्यांपूर्वी पुण्याहून परतली होती. यानंतर सदर दाम्पत्यास क्वारंटाईन करत त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. यानंतर त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना क्वारंटाईनमुक्त करुन 14 दिवस होमक्वारंटाईन करण्यात आले होते. या काळातही सदर दाम्पत्यास आरोग्य विषयक कोणत्याही तक्रारी उद्भवल्या नाहीत. दरम्यान प्रसुतीसाठी सदर महिलेस रविवार दि. 5 रोजी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसुतीनंतर तिचा स्वॅब घेतला असता यात ती कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान पांगिरे-बी येथे गुरुवारी सकाळी प्रशासनाने खबरदारी घेताना गाव पुन्हा सीलडाऊन केले आहे. तसेच कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे सुरू आहे.
कुडचीत कोरोनाचा दुसरा बळी
मिरज येथे बाधितावर अंत्यसंस्कार : पत्नी, मुलगा क्वारंटाईन : कुडचीतील बाधित भाग सील
वार्ताहर/ कुडची:
तीन महिन्यांपूर्वी हॉटस्पॉट बनलेली कुडचीत 12 जूनला कोरोनामुक्त झाली होती. गत आठ दिवसात आढळलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णापैकी दोघांचा मृत्यू झाल्याने कुडचीकर पुन्हा धास्तावले आहेत. बुधवारी उपचार सुरू असताना मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितावर मिरज येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले असून पत्नी आणि मुलग्याला मिरजमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर कुडची येथील घर आणि परिसर सील करण्यात आला आहे. कुडची जूनच्या दुसऱया आठवडय़ात कोरोनामुक्त झाल्यानंतर कुडची येथील वृद्धाचा बेळगावात कोरोनाने शनिवार दि. 4 रोजी मृत्यू झाला होता. त्याच्यावर बेळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यातून पुन्हा कुडचीत कोरोनाने एंन्ट्री केली होती. तर सोमवार आणि मंगळवार 7 रोजी दोघांना बाधा झाली होती. यातील 67 वर्षीय वृद्धावर बेळगाव तर मिरज येथे 59 वर्षीय रुग्णावर उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री मिरज येथे उपचार सुरू असतानाच कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. यानंतर बुधवारी दुपारी अधिकारी आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताची पत्नी आणि मुलग्याला मिरज येथेच क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान कुडचीत आठ दिवसात दोघांना मृत्यू तर एकाला बाधा झाल्याने पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव येथे उपचार घेत असलेल्या बाधिताच्या संपर्कातील 6 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर नगर परिषदेकडून खबरदारी सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे.
अथणी तालुक्याचा आकडा वाढताच
मिरज येथे बाधितावर अंत्यसंस्कार : पत्नी, मुलगा क्वारंटाईन : कुडचीतील बाधित भाग सील
वार्ताहर/ अथणी :
अथणी तालुक्यात प्रारंभी महाराष्ट्रातील मुंबई-पुणे रिटर्न, झारखंड येथील शिखरजीहून परतलेल्यांना कोरानाची बाधा होताना शिरकाव झाला. तर सध्या नजीकच्या सांगली, मिरज येथील बाधितांच्या संपर्कात आलेल्यांच्यातून लागण होताना कोरोनाचा आकडा वाढत आहे. याबरोबर अनेकांना कोणतीही ट्रक्हलहिस्ट्री नसताना आणि कोणाच्याही संपर्कात आलेले नसतानाही लागण झाली आहे. आतापर्यंत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अथणी तालुक्यात 38 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर नजीकच्या मिरज आणि सांगली येथे उपचार घेत असलेले कोरोनाबाधितांचा विचार केल्यास तालुक्यात 45 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होते. अथणी शहरातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे येथील व्यापाऱयांनी आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आमदार महेश कुमठहळ्ळी यांनी अथणी शहरत आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास आणखीन काही दिवस बंदचा कालावधी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच तालुक्यातील संबरगी, खिळेगाव, नदीइंगळगाव, कोहळ्ळी, शिरुर या भागातही कोरोनारुग्ण आढळून आल्याने अनेक गावे सीलडाऊन करण्यात आली आहेत. तसेच संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. असे असले तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
आपले जीवन, आपल्याच हाती…
अशा घटना पाहता जिल्हय़ात अनेकांना कोणतीही पार्श्वभूमी नसताना कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाचा स्थानिक पातळीवर फैलाव होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. हे लक्षात घेऊन वारंवार जागृती करुनही गांभीर्य नसलेल्या नागरिकांनी आता जबाबदारी ओळखणे अत्यावश्यक बनले आहे. आगामी एक महिना महत्त्वाचा असून याकाळात अनावश्यक कारणासाठी बाहेर पडणे, मास्क-हातमोजे न वापरणे, सॅनिटायझरचा वापर टाळणे हे प्रकार कोरोनाच्या समुह संसर्गास निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे आपले जीवन आपल्याच हाती हे लक्षात घेऊन नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.