प्रतिनिधी/ वास्को
चिखली ग्रामस्थांतर्फे आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गावातील गावडा समाजातील महिलांनी धालो व फुगडय़ा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी चिखलीतील ग्रामस्थांसह फादर डॉ. बोलामॅक्स पेरेरा उपस्थित होते. त्यांनी यावेळी धालो व फुगडीचा आस्वाद घेतला. स्थानिक महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन धालो नृत्य व पारंपरिक मांड सादर केले. चिखली गावात जेव्हापासून हा समाज स्थायीक झाला तेव्हापासून हा गट पारंपारिक धालो सादर करीत आहे. हा नृत्य प्रकार चिखली गावचा वारसा ठरला आहे.
दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या पारंपरिक कार्यक्रमात सत्तरहून अधिक महिला धालो नृत्य सादरीकरणात सहभागी होतात. गेल्या काही दिवसांपासून हा धालो उत्सव सुरू आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत हा कार्यक्रम चालतो.
धालो हा हिंदू व ख्रिश्चन गावडा महिलांचे नृत्य आहे. घराच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्याचा हा आगळावेगळा एक प्रकार आहे. धालो नृत्यात बारा किंवा त्याहून अधिक महिला एकमेकांना वेढलेल्या हातांनी दोन रांगा तयार करून हे नृत्य सादर करतात.
धालो सादरीकरणातून महिला नृत्याद्वारे त्यांची मूळ देवी सातेरी देवीला नमन करतात. नृत्य सादरीकरणा दरम्यान दोन रांगेतील नृत्य कलाकार एकमेकांशी भिडत असतात. आणि जीवनातील घटनांशी संबंधित गाणी सादर करतात. धालो नृत्याचा कार्यक्रम सतत पाच रात्री चालला. शेवटच्या दिवशी पारंपारिक वेशभूषेत नृत्य कलाकारांनी धालो सादर केले.
धालो आणि फुगडी सादरीकरणानंतर गटातील प्रत्येक सदस्यांना धर्मगुरू फादर डॉ. बोलामॅक्स पेरेरा व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.