प्रतिनिधी/ वास्को
लोकसभा खासदार विकास योजनेअंतर्गत चिखलीतील उपजिल्हा रूग्णालयाला लाभलेली एकमेव रूग्णवाहिका सध्या नादुरूस्त आहे. तीचे आरोग्यच धोक्यात आलेले असून रूग्णांचाही जीव धेक्यात येऊ शकतो. ही रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने आपत्कालिन परिस्थितीत रूग्णांना ने-आण करण्याच्या कामावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे नवीन रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयात आणीबाणीच्या प्रसंगी रूग्णांना घेऊन जात असताना वाटेत रूग्णवाहिका बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमुळे रूग्णांच्या नातेवाईकांना मोठय़ा गैरसोयीना सामोरे जावे लागत आहे. रूग्णांचाही जीव धोक्यात येऊ लागलेला आहे. काही वेळा रूग्णवाहिकेचा वापर औषधे व इतर वैद्यकीय साहित्याच्या वाहतुकीसाठीही केला जातो. एकच रूग्णवाहिका रूग्णांच्या सेवेसाठी असल्याने ऐनवेळी अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे राज्य सरकारने आरोग्य खात्यामार्फत नवीन रूग्वाहिका त्वरित उपलब्ध करावी अशी मागणी रूग्ण व त्यांच्या कुटुंबांकडून होत आहे. जेणेकरून आपत्कालिन परिस्थितीत अडकलेल्या रूग्णांचे प्राण वाचू शकतील.