प्रतिनिधी / मसूर
चिखली ता. कराड गावच्या हद्दीत हणबरवाडी धनगरवाडी योजनेच्या पाईपलाईन साठी खोदलेल्या चरित पावसाच्या साठलेल्या पाण्यात शेळ्या चारण्यासाठी गेलेला बालक बुडून ठार झाल्याची घटना गुरुवार दि. 17 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली, सिद्धेश हणमंत सरगर वय 12 मयत झालेल्या बालकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सध्या मसूर पूर्व भागात हणबरवाडी – धनगरवाडी योजनेच्या पाईपलाईनचे खुदाई चे काम सुरू आहे, चिखली ता कराड येथे सरगराची टेकडी नावाचे शिवारात हणबरवाडी धनगरवाडी योजनेचे पाईप लाईन साठी मोठी चर खोदण्यात आली आहे. कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे चरित पाणी साचले आहे. सिद्धेश हणमंत सरगर हा शेळ्या चारण्यासाठी या ठिकाणी गेला होता. अचानक पणे पाय घसरल्याने सिद्धेश हा चरी मध्ये पडला पोहता येत नसल्याने सिद्धेश चा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे चिखली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची खबर हणमंत गणपत सरगर यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.युवराज पवार करीत आहेत