राजेशकुमार मौर्य यांनी मांडले विचार : शिरीष देशपांडेंच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
चित्रकार हा रेषेला रेषा जोडून चित्र तयार करतो, असा काहींचा समज आहे. परंतु प्रत्यक्षात चित्रकार आपला जीव ओतून ती कलाकृती जीवंत करण्याचा प्रयत्न करतो. कोणतीही कला ही एका रात्रीत आत्मसात होत नसते. यासाठी अनेक दिवसांची साधना त्या पाठीमागे असते. चित्रकार शिरीष देशपांडे यांनी बॉलपेनच्या माध्यमातून रेखाटलेली चित्रे हा कलेचा अद्भुत नमुना असल्याचे गौरवोद्गार बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी काढले.
बेळगावचे चित्रकार शिरीष देशपांडे यांनी बॉलपेनच्या साहाय्याने रेखाटलेल्या विविध चित्रकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये झाले. या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर गोवा येथील लेखक, मुलाखतकार डॉ. गोविंद काळे, सुप्रसिद्ध सतारवादक संजय देशपांडे उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘एक्स्प्लोरिंग द बॉलपॉईंट’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. गोविंद काळे म्हणाले, शिरीष देशपांडे यांच्या कलेमुळे बेळगावला आज एक नवीन ओळख मिळाली आहे. जगद्विख्यात चित्रकारांमध्ये देशपांडे यांचे नाव गणले जात आहे. चित्रकार एका बॉलपेनच्या माध्यमातून काय क्रांती घडवू शकतो, हे त्यांनी दाखवून दिल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. संजय देशपांडे म्हणाले, बॉलपेनच्या माध्यमातून साकारलेली चित्रे हा कलेचा परिपाक आहे. हा प्रवास सोपा नव्हता. परंतु शिरीष यांनी आपल्या कलेला पैलू पाडत ही सुंदर कलाकृती घडविल्याचे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले.
चित्रकार शिरीष देशपांडे म्हणाले, कोणतीही कला ही सरावानेच आत्मसात होते. त्यातील बारीक पैलू समजू लागतात, असे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले.
प्रारंभी ज्ये÷ रंगकर्मी चंद्रकांत जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उज्वला देशपांडे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन वर्षा मराठे यांनी केले. यावेळी बेळगाव परिसरातील कलाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
अप्रतिम चित्रांचा समावेश…
चित्रकार शिरीष देशपांडे यांच्या 40 हून अधिक अप्रतिम चित्रांचा समावेश प्रदर्शनामध्ये आहे. निसर्गचित्र, व्यक्तिचित्र यासह विविध प्रकारांमध्ये चित्रे आहेत. 28 डिसेंबरपर्यंत टिळकवाडी येथील वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन खुले आहे.