ऍनिमेशनपटातही मालवणच्या सुपुत्राने वाजविला डंका : प्रकाश योजनाकार आशुतोष कुशे यांचे नेत्रदीपक यश
हॉलिवूडच्या झगमगत्या पडद्यापर्यंत यशस्वी प्रवास
मनोज चव्हाण / मालवण:
येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या आशुतोष प्रकाश कुशे यांचा कागदावरून सुरू झालेला चित्रकलेचा अखंड प्रवास आता हॉलिवूडच्या झगमगत्या मोठय़ा पडद्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. ऍनिमेशन क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांसोबत काम करत आशुतोष यांनी मालवणचे नाव उंचावले आहे. फ्रान्समधील ऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली होती. अल्पावधीतच आशुतोष यांनी मिळविलेले यश हे त्यांनी घेतलेल्या कष्ट आणि मेहनतीमुळे साध्य झाले आहे. या यशाबद्दल कुटुंबियांशी चर्चा करताना आशुतोष यांच्या मेहनतीची कल्पना येते.
सध्या मुलांना करिअरसाठी असंख्य वाटा उपलब्ध आहेत. तरीही आर्टस्, कॉमर्स, सायन्स डिग्रीच्या पुढे जाऊन आजची मुलं विचार करतातच, असं नाही. याला छेद देणारी मुलं अपवादात्मक असतात. असा अपवाद असणाऱया युवकाची यशोगाथा पाहणं महत्वाचं आहे. गेली 20 वर्षे ऍनिमेशन आणि व्हीएफएस इंडस्ट्रीमध्ये भारतातील मोठय़ा स्टुडिओंमध्ये काम करताना व्हिन्युअल आर्टचे पॅशन आणि टेक्स्चरिंग, शेडिंग, लायटिंग, कंपोझिंगमध्ये तज्ञ म्हणून कष्टपूर्वक त्यांनी आपली ओळख निर्माण केली. प्री-प्रॉडक्शन ते पोस्ट प्रॉडक्शनच्या प्रक्रियेत महत्वाची कामगिरी ते समर्थपणे बजावत आहेत.
शालेय शिक्षण मालवणमध्ये
वडील स्टेट बँकेत नोकरीला, आई उत्तम गृहिणी अशा सुसंस्कारीत कुटुंबात आशुतोष जन्माला आले. मालवणच्या काळेबाईंच्या बालवाडीतून टोपीवाला हायस्कूलमध्ये पहिलीत प्रवेश घेऊन दहावीपर्यंत ते स्थिरावले. मात्र, आर्टस्, कॉमर्स, सायन्स या सारखी पठडीतील डिग्री न घेता, काही तरी नाविन्यपूर्ण करण्याचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांचं हस्ताक्षर दाणेदार, छान आणि पेंटिंग, चित्रकलाही उत्तम होती. म्हणून सामंत सर आणि गिरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली रेखाकला ग्रेड परीक्षा उत्तमप्रकारे पास होत दहावीही उत्तीर्ण झाले. खरं तर मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ऍडमिशन मिळत होती पण काही अडचणींमुळे व कोल्हापुरात त्यांचे काका असल्याने तेथील कलानिकेतन महाविद्यालयात जी. डी. आर्ट कमर्शियलला प्रवेश घेतला. तिथेही काही जाहिरात कंपनीत त्यांनी काम केलं.
2000 मध्ये व्यावसायिक करिअरला सुरुवात
2000 मध्ये आशुतोष यांचं व्यावसायिक करिअर मुंबईच्या ‘सिल्व्हर टून’ या ऍनिमेशन स्टुडिओमध्ये बी. जी. पेंट आर्टिस्ट म्हणून सुरू झालं. याच स्टुडिओचा त्या काळात सुपर डय़ुपर टू-डी ऍनिमेशनपट ‘हनुमान’वरही त्यांनी पहिल्यांदा काम केलं. नंतर 2003 मध्ये बंगलोरच्या ‘जादू वर्क्स’ स्टुडिओत टू-डी. बी. जी. पेंटर म्हणून नेमणूक झाली. यावेळी मॉडेलिंग, टेक्स्चरिंग, लायटिंग आणि कंपोझिंग या सारख्या विविध विभागात प्राविण्य मिळवित थ्री-जी आणि लायटिंग टिम हेड म्हणून डिज्नेच्या ‘हिगली हाऊस हिरोज’ या सिरिजचे काम सांभाळले. 2005 मध्ये मुंबईच्या यू-टीव्ही टून्समध्ये सरफेरिंग आणि मॅट डिपार्टमेंट हेड म्हणून काम करताना टेक्स्चरिंग, डिपार्टमेंटची क्रिएटिव्ह साईट सांभाळली आणि म्हणूनच सरफेसिंग हेड म्हणून एक क्वालिटी बेंचमार्क निर्माण केला, की जो यू-टीव्हीच्या कार्यपद्धतीला साजेसा होता. याच काळात यू-टीव्हीच्या होम प्रॉडक्टच्या ‘अर्जुन’वर उत्तमरित्या काम केले. या त्यांच्या योगदानामुळे फ्रान्समधील ऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन फिल्म फेस्टिव्हलला प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना मिळाली.
कार्यक्षम प्रकाश योजनाकार म्हणून निर्माण केली ओळख
2007 मध्ये रिलायन्स बिग ऍनिमेशन स्टुडिओ, पुण्यामध्ये सहदिग्दर्शक लायटिंग आणि सरफेसिंग म्हणून आशुतोष रुजू झाले. कार्यक्षम लायटिंग दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध सिरियल ‘लिटिल कृष्णा’वर काम करण्याचा योग आला. शिवाय आरकॉम कमर्शिअल्स, आयपी मूव्हीज ट्रेलर्स, बिग बीच्या सिरियल्स, बार्तयार्ड सिरिज, व्हेन्नेटा कुचिनी यासाठीही आशुतोष यांनी मेहनत घेतली.
परदेशातील कंपन्यांसाठीही काम केले
आशुतोष यांनी माया डिजिटल मीडिया प्रा. लि., मुंबईमध्ये एचओडी लायटिंग म्हणून कार्यभार स्वीकारला. यावेळीच बीबीसीच्या ‘एव्हरिथिंग रोसिंग’ ही सिरीज खराब स्थितीत आणि दर्जाहिन अवस्थेत त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी परिश्रमपूर्वक त्याला वेगळा आयाम आणि दर्जा प्राप्त करून देण्याची किमया करून दाखविली. त्याच्या या अजोड किमयेमुळे त्या परदेशी कंपनीचे लाखो रुपयांचे नूकसानही टळले. अर्थात याबद्दल त्याचा यथोचित सन्मानही करण्यात आला. आयर्लंडच्या बीबीएफ या प्रसिद्ध ‘ऑक्टोनॉट्स’ या सिरिजच्या सिझन एकचे कामही पाहिले. क्रेस्ट ऍनिमेशन स्टुडिओमध्ये सीजी लायटिंग प्रोजेक्ट सुपरवायझर म्हणून ब्राऊन बॅग फिल्मच्या ऑक्टोनॉट्स सिरिजच्या सीझन 2 व 3 चेही काम पाहिले.
अनेक ऍनिमेशन चित्रपटांमध्ये कामगिरी
व्हीएफएसमध्ये भारतातील पायाभूत संस्था जाते. अशा मुंबईच्या प्राझ्मा फोकसच्या डबल निगेटिव्ह व्हिज्युअल इफेक्टस्मध्ये तो अनेक परदेशी कंपन्यांच्या व्हीएफएस प्रोजेक्टरवर काम करतो आहे. विविध हॉलिवूड चित्रपटांसाठी सीजी सुपरवायझर म्हणून जबाबदारी सांभाळतो आहे. डबल निगेटिव्हच्या अजोड कामगिरीमुळे परदेशी चित्रपटांना ऑक्सरच्या विविध पारितोषिकांबरोबरच व्हिज्युअल बॉलिवूडच्या बडय़ा-बडय़ा बॅनरखाली जसे डिज्नेच्या ‘जंगलबूक’, पॅरामाऊंट पिक्चर्सच्या ‘इनफिलाईट’, नेटाफिक्सच्या ‘किंग’, वॉर्नर ब्रदर्सचा ‘गॉडझिला,’ युनिव्हर्सल स्टुडिओच्या ‘पॅसिफिक रिम’, चेरनीन एंटरटेनमेंटचा ‘रेड स्पॅरो’, मार्व्हल स्टुडिओचा ‘ब्लॅक पँथर’, ऑक्सर विजेता वॉर्नर ब्रदर्सचा प्रसिद्ध क्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ‘डंकर्क,’ ट्रि-स्टार पिक्चर्सचा ‘बेबी ड्रायव्हर’, कोलंबियाचा ‘इन्फर्नो’, युनिव्हर्सल पिक्चर्सचा ‘स्टार टॅक’ अशी भोठी लिस्ट आहे.
विद्यार्थ्यांची आवड ओळखा – प्रकाश कुशे
यशस्वी व्यक्तींच्या श्रेय नामावलीत अन्य दिग्गज परदेशी तंत्रज्ञांच्या बरोबरीने आशुतोष कुशे या मालवणी मुलाचं नाव असणं हा मालवणचा डंका वाजविणारा आहे. 20 वर्षांपूर्वी कागदावरून सुरू झालेला अखंड प्रवास हॉलिवूडच्या झगमगत्या मोठय़ा पडद्यापर्यंत जाऊन पोहोचणे ही अविश्वसनीय बाब आहे. आपल्या पाल्याची खरी बलस्थाने आणि ताकद ओळखून त्यांच्या मनाप्रमाणे त्याला क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठिंबा त्याच्या पालकांनी दिला, तर तो पाल्य काय करून दाखवू शकतो, याचं हे सुंदर उदाहरण आहे, असे आवर्जून प्रकाश कुशे म्हणाले.