आपल्या देशात आवर्जून पाहण्याजोगी अनेक ठिकाणं आहेत. या ठिकाणांना भेट देणंहा अविस्मरणीय अनुभव असतो. त्यादृष्टीने आज आपण चित्रकूट या ठिकाणाविषयी जाणून घेऊ. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या मध्यभागी विंध्य पर्वतरांगा आहेत. याच परिसरात घनदाट जंगलही आहेत. विंध्य पर्वतरांगा आणि घनदाट जंगलांमध्ये अत्यंत सुंदर असं चित्रकूट वसलं आहे. चित्रकूट परिसर खूपच मनोहारी आहे. चित्रकूटला आल्यावर आपले सगळे ताणतणाव दूर होतात. काही दिवस शांत आणि निसर्गरम्य वातावरणात घालवायचे असतील तर तुम्ही चित्रकूटला जाऊ शकता. चित्रकूट जवळच्या कर्वी परिसरात विनायक राव पेशवे यांचा महाल आहे. इथे गणेशबाग नावाचं एक स्थान आहे. इथे मध्य प्रदेशमधल्या खजुराहोसारख्या मूर्ती पहायला मिळतात. म्हणून गणेशबागला मिनी खजुराहो असंही म्हटलं जातं. चित्रकूटपासून जवळच अगस्त्य मुनींचा आश्रम आहे. या आश्रमालाही नक्कीच भेट द्या. तरौंहा किल्ला आणि झारखंडी मातेचं मंदिर ही इथली खास आकर्षणं आहेत. चित्रकूटपासून 18 किलोमीटर अंतरावर गुप्त गोदावरी आहे. राम, लक्ष्मण आणि सीता वनवास काळात या भागात राहिल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे हा परिसर खूपच पवित्र मानला जातो. इथल्या भल्यामोठय़ा खडकावर हनुमानाचं मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिरात जाण्यासाठी बऱयाच पायऱया चढाव्या लागतात. या मंदिरातून चित्रकूटचा रम्य परिसर न्याहाळता येतो. इथल्या कोल्हुआ जंगलात बाणगंगा आहे. या स्थानाचा संबंध महाभारतकाळाशी लावला जातो. अशी प्रमुख वैशिष्टय़ं असणारं हे चित्रकूट आवर्जून बघण्यासारखं आहे.
Previous Articleसंचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी साखर कारखान्यावर कारवाई
Next Article सावर्डे पाटणकरमध्ये रक्तदान शिबिर संपन्न