वार्ताहर / पाचगाव
आर. के. नगर चित्रनगरीच्या ओसाड माळावर शैक्षणिक संकुल असणाऱ्या ठिकाणी एक किलोमीटरच्या अंतरात नऊ लॉजिंग असून या लॉजिंगमुळे अनेक युवक-युवतींच्या आयुष्याला वाईट वळण लागत आहे.
आर. के. नगर चित्रनगरी परिसरात भारती विद्यापीठ, के. आय. टी. कॉलेज ही शैक्षणिक संकुल आहेत. या शैक्षणिक संकुलापासून हाकेच्या अंतरावर एकमेकांना लागून नऊ लॉजिंग आहेत. या लॉजिंगच्या दारात सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात टू व्हीलर दिसून येतात. पर्यटकांना राहण्याच्या दृष्टीने लॉजिंगचा वापर होणे अपेक्षित आहे. मात्र, या ओसाड माळावर कोणते पर्यटक येतात याचे उघडगुपित पोलिसांना देखील माहिती असल्याची चर्चा आहे.
या लॉजिंगचे मालक वेगळेच आहेत. 40 ते 50 हजार रुपये मासिक भाड्यावर ही लॉजिंग चालवण्यासाठी दिली असून येथील लॉजिंगमधील रुमचे दर हे तासावर आकारले जातात. इथे रूमसाठी 2 तासाला 400/ रू दर आहेत. या परिसरातील लॉजिंगमध्ये अनेक वेळा अल्पवयीन युवक-युवतीचा वावरही आढळून येतो. नुकतेच या परिसरात अत्याधुनिक एसी सुविधा असणारे लॉजिंगही सुरू झाले आहे. यामुळे या व्यवसायामधून मोठ्या प्रमाणात लॉजिंग मालकांची चांदी होत असल्याचे दिसते.
या परिसरातील लॉजिंगमधून अनेक काळे धंदे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र, पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. पोलिसांचे वाहन ही जेवणाचे पार्सल घेण्यासाठी या परिसरातील हॉटेल व लॉजिंगसमोर अनेक वेळा थांबल्याचे नागरिकांना आढळून आले आहे. अनैतिक कृत्यांचे आगार असणाऱ्या या परिसरातील लॉजिंगवर पोलीस कारवाई करण्याचे धाडस का दाखवत नाहीत ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. लॉजिंगमधे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच पोलीस प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.