अंतर्गत राजकारण आणि अर्थकारणावरून संचालक मंडळात रस्सीखेच
कोल्हापूर / अहिल्या परकाळे
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यालयातच सातत्याने सदस्यांना वेठीस धरण्याचे प्रकार घडतात. कोल्हापूर कार्यालयात अंतरगत राजकारणावरून सातत्याने वादाची ठिणगी पेटत आहे. यामध्ये कोल्हापुरातील स्थानिकांसह इतर जिल्हय़ातील सदस्यांचा सहभाग आहे. मुख्य कार्यालयायालाच टाळे ठोकून कोल्हापुरची बदनामी स्थानिकच करित आहेत, अशी चर्चा रविवारी दिवसभर सोशल मिडीयावर रंगली होती. त्यामुळे हा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या विभाजनाचा डाव असल्याची चर्चा चित्रपट महामंडळाच्या सदस्यांकडून उपस्थित केली जात आहे.
चित्रपट महामंडळाच्या विद्यमान संचालक मंडळाच्या प्रयत्नामुळे प्रत्येक जिल्हय़ात चित्रपट महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय झाले, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. परंतू हेच संचालक मंडळ अंतर्गत वादामुळे एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत. परिणामी राज्यभरातील चित्रपट महामंडळाच्या सदस्यांमध्ये असंतोष पसरला आहे. पाच लाख रूपये खर्च करून शहाजी कॉलेजमध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कलाकारांच्या हिताचा निर्णयच झाला नाही. तर राजकारण्यांना लाजवेल अशा राजकारणामुळे एखाद्या भूमिकेवेळी रंगवलेल्या चेहऱयाच्या पाठीमागील मूळ चेहरे समाजासमोर आले. पुणे, मुंबईपेक्षा कोल्हापुरच्या तंत्रज्ञ व कलाकारांना कामाची गरज आहे. परंतू अंतर्गत राजकारणामुळे कोल्हापुरात चित्रिकरणासाठी निर्मार्ते येण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. चार मालिका सोडल्या तर कोल्हापुरात मोठय़ा चित्रपट येत नाही. स्थानिक संचालकांनी एकत्र येऊन चित्रनगरीला पूर्वीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
कोल्हापुरातील कलाकारांची शासन दरबारी नोंद झाली का ?
गेल्या दोन महिन्यापासून राज्यभरातील कलाकारांची शासन दरबारी नावनोंदणी सुरू आहे. परंतू कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात एखादी समिती नेमली आहे का? नेमली असेल तर किती लोकांची नावनोंदणी झाली हा प्रश्न प्रलंबितच आहे. तसेच कोल्हापुरातील रेल्वे स्टेशसमोर अडीच कोटी रूपये खर्च करून चित्रपट महामंडळाचे नवीन कार्यालय घेतले आहे. हे कार्यालय कधी सुरू होणार याकडे राज्यभरातील सभासदांचे लक्ष लागले आहे.
कार्यालयाला टाळे ठोकण्याचा अधिकार कोणा एकाला नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाची ऑनलाईन बैठक वेळोवेळी घेऊन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. चित्रपट महामंडळाचे ऑडीटही झाले आहे. चर्चेतून सर्व प्रश्न सुटतात. बैठकीसाठी कोल्हापुरातील मुख्य कार्यालयाला टाळे ठोकण्याचा अधिकार कोणा एकाला नाही. या प्रकारासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन, संबंधितांवर कारवाई केली जाईल. मी पैसे खाल्ले असा कोणी आरोप करीत असेल तर प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी करण्यापेक्षा कायदेशीर लढाई लढावी.
मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ)
कोल्हापुरचे कार्यालय पुण्याला जाऊ देणार नाही
कोल्हापुरचे मुख्य कार्यालय पुण्याला घेऊन जाण्याचा काही सदस्यांचा डाव आहे. वर्गणीतून उभारलेले कोल्हापुरचे कार्यालय इतर ठिकाणी घेऊन जाण्याचा डाव कोल्हापुरकर हाणून पाडतील. मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत कोल्हापुरातील नवीन कार्यालयाच्या इंटिरिअर डिझाईनसाठीचा खर्चास मंजुरी द्यावी. लगेच कामाला सुरूवात होईल.
धनाजी यमकर (उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)