ऑनलाईन टीम / मुंबई :
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अन्य 10 सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात महिला व बालविकास महामंडळाने मंगळवारी आदेश जारी केले आहेत.
चित्रा वाघ यांनी गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकी दरम्यान, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्या वेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघ यांची मंडळाच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली होती. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपबरोबरची युती तोडून दोन्ही काँग्रेस सोबत महविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर महाविकस आघाडी सरकार कडून भाजपने केलेल्या विविध मंडळावरील नियुक्त्या रद्द केल्या आहेत. याच पार्शवभूमीवर चित्रा वाघ यांच्यासह अन्य दहा सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
या दहा सदस्यांमध्ये रत्नागिरीच्या दर्शना महाडिक, नागपूरच्या वीणा तेलंग, मुंबईतील शलाका साळवी, रितू तावडे, पिंपरीतील चंद्रकांता सोनकांबळे, लातूर मधील मीनाक्षी पाटील, औरंगाबाद मधील साधना सुरडकर, आष्टीतील शैलजा गर्दे, परळीतील उमा रामशेट्टी आणि नागपुर मधील अर्चना डेहनकर यांचा समावेश आहे.