भाजपचे आवाहन
प्रतिनिधी / पणजी
चीनची उत्पादने, साहित्यावर बहिष्कार टाका आणि स्वदेशी उत्पादने वापरा, असे आवाहन भाजपने केले असून मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक अंतर पाळून संपूर्ण राज्यात विविध प्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आखण्यात आले आहेत. त्यावेळी सर्व ती मार्गदर्शक तत्वे पाळण्याची खात्री भाजपने दिली आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जे जनहिताचे निर्णय घेतले त्याची माहिती गोव्यातील जनतेला देण्यासाठी पत्रके वाटण्यात येणार आहेत. गोव्यात साधारणपणे 4.50 लाख घरे आहेत. त्यातील सुमारे 2 लाखापेक्षा अधिक घरांना भेटी देऊन मोदी सरकारने मागील एका वर्षाचे रिपोर्ट कार्ड (पत्रके) सादर केले जाणार आहे. त्यासाठी भाजपचे दोघेजणच घरोघरी फिरणार आहेत.
दोन्ही जिल्हय़ात तसेच प्रत्येक तालुक्यात पत्रकार परिषदा घेऊन भाजपतर्फे मोदी सरकारची वर्षपूर्तीची माहिती देण्यात येणार आहे. त्या शिवाय डिजीटल स्वरुपात आणि सोशल मीडिया माध्यमातून मोदी सरकारने वर्षभरातील कार्य जनतेसमोर ठेवण्यात येईल. दोन्ही जिल्हय़ात प्रत्येकी एक म्हणजे दोन व्हिडीओ मेळावे घेण्यात येणार असून त्यात घरी बसून सहभागी होता येईल, असे तानावडे म्हणाले.
मोदी सरकारची वर्षपूर्ती दणक्यात साजरी करण्यात येणार होती. परंतु कोरोनाच्या संकटामुळे गर्दी करणारे कार्यक्रम टाळले जाणार असून गर्दीला फाटा देऊन जास्तीत जास्त गोमंतकीय जनतेपर्यंत विविध मार्गाने मोदी सरकारचे कार्य पोहचवण्याचा भाजपचा इरादा असल्याचे तानावडे यांनी नमूद केले. गोव्यात कोरोना नियंत्रणात असल्याचा तसेच परप्रांतीयांची योग्य ती व्यवस्था सोय करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. पत्रकार परिषदेला दामू नाईक, विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर उपस्थित होते.