दिल्ली, गुरुग्रामसह बेंगळूरमध्ये कारवाई, दस्तऐवजांची तपासणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
करचुकवेगिरीच्या तपासाचा एक भाग म्हणून चिनी दूरसंचार कंपनी ‘हुवावे’च्या भारतातील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. कंपनीच्या दिल्ली, गुरुग्राम आणि बेंगळूर येथील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान बरेच दस्तऐवज जप्त करण्यात आले असून त्यांची अधिक तपासणी केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून यासंबंधी तपास सुरू आहे. मात्र, आपली कंपनी कायद्याचे पूर्णपणे पालन करत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
छाप्यादरम्यान आयटी अधिकाऱयांनी आर्थिक कागदपत्रांची तपासणी केली. याचदरम्यान भारतीय व्यवसाय आणि परदेशी व्यवहार यांच्याविरोधात कथित करचुकवेगिरीच्या चौकशीचा एक भाग म्हणून काही रेकॉर्डही जप्त केले. सध्या या छाप्यांबाबत प्राप्तिकर विभागाकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. तरीही दिल्ली, बेंगळूर आणि गुरुग्राम याठिकाणी एकाचवेळी पडलेल्या छाप्यानंतर यासंबंधी बरीच चर्चा सुरू झाली होती. दोन दिवसांपूर्वीच केंद सरकारने 50 हून अधिक चिनी ऍप्सवर बंदी घातली होती. त्यामुळे चिनी कंपन्या भारतीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असल्याचा दावाही केला जात आहे.