वुहानमधून नोंद केली 60 जीएसटी खाती, बनावट कंपन्याही स्थापन, करविभागाकडून चौकशी सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील वुहान येथील एका चीनी रहिवाशाने भारतात उघडलेली तब्बल 60 जीएसटी खाती व्यापारी कर विभागाने शोधून काढण्याची घटना घडली आहे. बेंगळूर येथे ही कारवाई करण्यात आली. या चीनी नागरीकाने बेंगळूर येथे एक अनधिकृत वेअरहाऊसही भाडय़ाने घेतले असून त्यावर शुक्रवारी धाड टाकण्यात आली. या वेअरहाऊसमधून 4 कोटी रूपयांचा चीनी माल जप्त करण्यात आला.
या वेअरहाऊसमधून चीनी बनावटीच्या एकंदर 25 हजार 446 इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या. याच वेअरहाऊसमधून जप्त केलेल्या कागदपत्रावरून या चीनी नागरीकाने केंद्रीय आणि राज्य स्तरीय अशी 60 जीएसटी खाती उघडल्याचे उघडकीस आले. या खात्यांवरून त्याने सादर केलेल्या करविवरण पत्रातही मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समजून येत आहे. अनेक खात्यांमधून शून्य कराची विवरणपत्रे सादर करण्यात आली आहेत तर अनेक खात्यांमधून एकही विवरण पत्र सादर करण्यात आलेले नाही, असेही प्राथमिक तपासाअंती कळलेले आहे. ही साठ खाती उघडण्यासाठी या व्यक्तीने 60 वेगवेगळय़ा फर्मस् उघडल्या असल्याचेही तपास अधिकाऱयांच्या लक्षात आले आहे.
या व्यक्तीने 2017 मध्ये 1 तर 2018 मध्ये 43 जीएसटी खाती उघडली. 2019 मध्ये 14 तर 2020 मध्ये 1 खाते उघडल्याचे दिसून आले. ही सर्व खाती वेगवेगळय़ा व्यक्तींच्या नावाने उघडण्यात आली आहे. या वेअरहाऊसवर धाड पडली तेव्हा ही व्यक्ती किंवा इतर 59 खातेदार उपस्थित नव्हते. त्यांचा शोध घेतला जात आहे. त्याने सुरू केलेल्या 60 फर्म या खासगी कंपन्यांच्या स्वरूपात आहेत. तसेच यापैकी 58 कंपन्यांमध्ये 24 संचालक आलटून पालटून नेमण्यात आलेले आहेत. या संचालकांची नावे बनावट आहेत की खरी आहेत याचाही शोध घेण्यात येत आहेत.
वुहानमध्ये व्यवसाय
या चीनी नागरीकाचा व्यवसाय वुहानमध्ये असून त्याने भारतातील व्यवसाय सांभाळण्यासाठी बेंगळूरमध्ये मध्यस्थ आणि कर्मचारी नेमलेले आहेत. सध्या त्याचे वेअरहाऊस सील करण्यात आलेले असून पुढील तपासणी सुरू आहे. या चीनी व्यक्तीचे नाव हेतुपुरस्सर गुप्त ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.