किटचा खर्च उचलण्यासाठी नवे प्रायोजक शोधणार, महिनाअखेरपर्यंत नवा करार होण्याची अपेक्षा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचे किट प्रायोजक चायनीज स्पोर्ट्सवियर कंपनी लि निंगला भारतीय ऑलिम्पिक संघटनेने डच्चू दिला असून किटचा खर्च उचलण्यासाठी ते आता नव्या प्रायोजकाच्या शोधात असणार आहेत. भारतीय नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आपण चिनी प्रायोजकांशी असलेला करार रद्द करत असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने जाहीर केले.
यंदाची ऑलिम्पिक दि. 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होत असून भारतीय पथकातील सदस्यांच्या किटचा खर्च लि निंग ही चिनी कंपनी उचलणार होती. मात्र, ऑलिम्पिक उंबरठय़ावर असताना त्यांचा करार रद्द करण्याचा निर्णय भारतीय ऑलिम्पिक संघटनेने घेतला. नवे प्रायोजक शोधण्यासाठी अतिशय कमी वेळ आहे. जर वेळेत प्रायोजक मिळत नसतील तर खेळाडूंच्या किटवर कोणत्याही कंपनीचा लोगो नसेल, असे आयओएचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी स्पष्ट केले.
‘नवे प्रायोजक शोधण्याची प्रक्रिया एव्हाना सुरु केली गेली आहे. पण, हातात अतिशय कमी वेळ आहे आणि आम्हाला कोणावर दडपणही आणायचे नाही. या क्षणी करार हा उभय घटकांच्या संमतीने होणे आवश्यक आहे. तूर्तास, भारतीय पथकातील सर्व सदस्यांचे किट तयार आहेत आणि प्रायोजक मिळणार का, याचीच आम्हाला प्रतीक्षा आहे. जर वेळेत प्रायोजक मिळाले तर त्यांचा लोगो किटवर असेल आणि जर प्रायोजक मिळत नसतील तर किट आहे त्या स्थितीत ऍथलिट्सकडे सुपूर्द केले जाणार आहेत’, असे बात्रा पुढे म्हणाले.
लि निंगच्या उत्पादनाचे भारतातील वितरक असणाऱया सनलाईट स्पोर्टस कंपनीने भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा हा निर्णय स्वीकारला आहे. याबद्दल बोलताना भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता म्हणाले, ‘सनलाईट स्पोर्टस संघाला जागतिक स्थितीची कल्पना आहे. शिवाय, देशातील संमिश्र मतमतांतरांची देखील माहिती आहे. त्यामुळे, त्यांनी हा निर्णय मान्य केला आहे’.
भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी ली निंग कंपनी किट प्रायोजक होते तर उद्घाटन सोहळय़ातील पथसंचलनातील भारतीय सदस्यांचा पोशाख रेमंड कंपनीने पुरस्कृत केला आहे.
बॉक्स
भारतासह ‘या’ 9 देशांवर बंदी, ही निव्वळ अफवा!
कोरोनाचा उद्रेक झालेल्या भारतासह एकूण 9 देशांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ दिले जाणार नाही, अशा आशयाचे एका मलेशियन माध्यमाने दिलेले वृत्त भारतीय ऑलिम्पिक संघटनेने स्पष्टपणे फेटाळले आहे. ‘आम्हाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती किंवा आयोजन समितीकडून असे काहीही कळवले गेले नाही. पण, तरीही आम्ही याबाबत त्यांच्याकडे थेट विचारणा केली आहे आणि कोरोनाच्या बाबतीत भारतातील स्थिती सुधारत आहे’, असे आयओए अध्यक्ष बात्रा याप्रसंगी म्हणाले. भारतासह पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, अफगाणिस्तान, व्हिएतनाम व युकेचा यात समावेश असल्याचे सदर वृत्तात म्हटले होते.
बॉक्स
भारतीय पथकाचे नेतृत्व यंदा दोघा क्रीडापटूंकडे!
ऑलिम्पिक पथसंचलन सोहळय़ात एरवी भारतीय पथकाचे नेतृत्व एकाच ऍथलिटकडे असते. पण, यंदा ही परंपरा मोडीत काढली जाणार असून भारताचे 2 ध्वजवाहक असतील, असे संकेत आहेत. यातील एक ध्वजवाहक पुरुष व एक ध्वजवाहक महिला ऍथलिट असेल, याचा बात्रा यांनी येथे उल्लेख केला. यापूर्वी 2016 मधील रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व भारताचा आजवरचा एकमेव वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णजेता अभिनव बिंद्राने केले होते. यंदा भारताप्रमाणेच ग्रेट ब्रिटनच्या पथकातही 2 ध्वजधारक असणार आहेत.