राष्ट्रपती अन् माजी पंतप्रधानांची घेतली भेट
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सरकार संकटात आहे. परंतु याचदरम्यान ओली हे चीनचे समर्थक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ओली सरकार वाचविण्यासाठी चीनचा काठमांडूतील दूतावास अत्यंत सक्रीय दिसून येत आहे. चिनी राजदूत होउ यांगकी यांनी नेपाळमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. तर शुक्रवारी त्यांनी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेतली होती. मे महिन्यातही ओली सरकार कोसळण्याचा धोका निर्माण झाला असता यांगकी यांनी विरोधी गटाच्या नेत्यांची भेट घेत सरकार वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
होउ यांगकी नेपाळच्या राजकारणात थेट हस्तक्षेप करत आहेत. यांगकी यांनी माजी पंतप्रधान माधवकुमार नेपाळ यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली आहे. विद्यादेवी भंडारी राष्ट्रपती असल्या तरीही पक्षात त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त आहे. तर माधवकुमार हे पंतप्रधान ओली यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
या दोन्ही नेत्यांची समजूत काढून ओली यांचे सत्तास्थान वाचविण्याचा प्रयत्न यांगकी यांनी चालविला आहे. नेपाळच्या राजकारणातील यांगकी यांचा हस्तक्षेप आता लपून राहिलेला नाही. परंतु यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या 40 पैकी 30 सदस्य पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
राजीनाम्याबद्दल गूढ कायम
कम्युनिस्ट पक्षांतर्गत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पंतप्रधान ओली आणि विरोधी गटाचे नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांच्यातील प्रदीर्घ चर्चा संपुष्टात आली आहे. परंतु स्थायी समितीची बैठक दोन दिवस लांबणीवर टाकण्यात आली आहे. सत्तास्थान कायम राखण्यासाठी ओली सर्वप्रकारच्या क्लृप्त्या वापरत आहेत. ओली यांनी राजीनाम्यास नकार दिला तर पक्षात फूट पडू शकते. एक गट ओली तर दुसरा गट प्रचंड यांच्यासोबत राहू शकतो.
प्रभावशाली विदेशी मुत्सद्दी
यांगकी यांना नेपाळमधील सर्वात प्रभावशाली विदेशी मुत्सद्दी मानले जात आहे. नेपाळच्या सर्वोच्च नेतृत्वासह सैन्यापर्यंतही त्यांचा थेट संपर्क आहे. नेपाळचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ पूर्णचंद्र थापा यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. 13 मे रोजी चीनच्या दूतावासात प्रीतिभोजन पार पडले होते आणि यात थापा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.