सैन्यात सामील होण्यास नागरिकांची टाळाटाळ
बीजिंग
पूर्व लडाखमध्ये भारतीय भूमीवर कब्जा करू पाहणाऱया चिनी सैन्याला शोधूनसुद्धा नवे सैनिक मिळत नसल्याची स्थिती आहे. चीनचे तरुण-तरुणी आता सैन्याऐवजी अन्य आकर्षक नोकऱयांमध्ये रुजू होणे पसंत करत आहेत. या स्थितीमुळे पीपल्स लिबरेशन आर्मीसमोर नवी समस्या उभी राहिली आहे. याचबरोबर चीनच्या सुमारे 5 कोटी 70 लाख माजी सैनिकांमध्येही निवृत्तीनंतर सुविधा न मिळाल्याने असंतोष धगधगू लागला आहे. या माजी सैनिकांची समजूत काढण्यासाठी चीन प्रशासन आता विविधे प्रलोभने दाखवत आहे. चीनचे सैन्य आता सुशिक्षित तरुणांना आकर्षित करण्यास अपयशी ठरत आहे. या तरुणांकडे आता पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत अधिक पर्याय उपलब्ध आहेत. तरुणांसाठी सैन्य आकर्षक पर्याय ठरावा, याकरता चीनला अधिक काम करण्याची गरज असल्याचे वुहान विद्यापीठातील राजशास्त्राचे प्राध्यापक क्नि किआनहोंग यांनी म्हटले आहे.
माजी सैनिकांची निदर्शने
अलिकडच्या वर्षांमध्ये कुठल्याच सुविधा न मिळाल्याने माजी सैनिकांनी मोठय़ा प्रमाणात निदर्शने केली आहेत. मागील वर्षी जानेवारीमध्ये 19 माजी सैनिकांना निदर्शनांप्रकरणी अटक करण्यात आली होती. या असंतोषानंतर चीनने आता माजी सैनिकांसाठी बुधवारी एक नवा कायदा संमत केला आहे. चीनमध्ये एकूण 5 कोटी 70 लाख माजी सैनिक आहेत.