ऑटो निर्मात्यांना चालू वर्षात 8 लाख कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॉम्प्युटरपासून ते कारपर्यंतचे उत्पादन करताना ‘चिप’चा वापर केला जातो. परंतु याच ‘चिप’च्या कमतरतेमुळे सदरचे उत्पादन पुन्हा एकदा प्रभावीत झाले आहे. याचा सोपा अर्थ लक्षात घेतल्यास वाहन उद्योगापासून ते इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना आता चिपच्या कमतरतेमुळे समस्यांना तेंड द्यावे लागते आहे.
चिपचे उत्पादन कमी राहिल्यामुळे नवीन धोके निर्माण होण्याचे संकेतही व्यक्त केले जात आहेत. कारण महामारीच्या संकटामुळे उत्पादन संथ झाल्याचा नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सस्कुहन्ना फायनान्शिअल समूहाच्या रिसर्चच्या माहितीनुसार एप्रिलमध्ये चिपची ऑर्डर आणि पुरवठा यांच्यातले अंतर वाढत जात 17 आठवडय़ावर (जवळपास 4 महिने) पोहचले आहे. 2017 मधील स्थिती लक्षात घेतल्यास या चिप वेटिंग कालावधीने नवा विक्रम नोंदवला असल्याचे म्हटले आहे.
चिपच्या कमतरतेमुळे कार, गेमिंग कंसोल आणि रेफ्रिजरेटर यासारख्या उत्पादनांचे शिपिंग थांबले आहे. तसेच फोर्ड मोटर, जनरल मोटर कंपनीला आवश्यक तेवढे सुटेभाग मिळाले नसल्यामुळे आपले प्रकल्प बंद करावे लागले आहेत. या कारणामुळे ऑटो निर्मात्यांना चालू वर्षातील विक्रीमध्ये जवळपास 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच प्रकल्प बंद केल्याने रोजगारात घट होत गेल्याने भविष्यातही नुकसानीची चिंता कायम राहणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
महामारीचा तैवानला फटका
चिप उत्पादनात तैवानची हिस्सेदारी मोठी आहे. यामुळे जगातील सर्वाधिक कंपन्या या तैवानवरच अवलंबून आहेत. परंतु कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा चिप उत्पादनाबाबत संकटे वाढली आहेत. तैवानमध्ये सेमीकंडक्टर उत्पादन बनविणाऱयाही कंपन्या आहेत.
जपान स्थानिक चिप उत्पादनास देणार चालना
निक्केई वृत्तपत्रानुसार जपान चालू वर्षात स्थानिक सेमीकंडक्टर आणि बॅटरी उत्पादनास चालना देणार आहे. यासाठी सर्वाधिक खर्चासाठीची तरतूद केल्याची माहिती आहे. सरकारी इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱया बॅटरीज विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.