रोख रक्कम व दागिने घेऊन चोरटे पसार
प्रतिनिधी/ सातारा
मांढरे आळीतील इथापे नामक वयोवृध्द महिला बुधवारी सकाळी बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्या पैसे काढून पायीच घराकडे मधल्या वाटेने चालल्या होत्या. चिपळूणकर शाळेच्या समोर दोन जणांनी त्यांना पुढे बारशाचा कार्यक्रम सुरु आहे. तुम्हालाही साडी नेसावायची आहे, अशी बतावणी करुन त्यांच्याजवळचा ऐवज काढून घेत पोबारा केल्याने ती वृध्द महिला या प्रकाराने भांबावली गेली. स्थानिक नागरिकांच्या बाब निदर्शनास येताच त्यांनी शाहुपूरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे घटनास्थळी पोहोचले. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने तपासात अडथळे आले. याची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांकडून माहिती मिळू शकली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चिपळूणकर शाळेच्यासमोरील रस्त्यावर एक वृद्ध महिला भांबावलेल्या अवस्थेत स्थानिक नागरिकांना दुपारी 11.30 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. त्यांनी जवळ जाऊन त्या महिलेची चौकशी केली असता दोन जणांनी जवळचे पैसे, दागिने घेऊन गेले असल्याचे सांगताच घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी लगेच शाहुपूरी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.
शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे डीबी पथकास घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्या महिलेकडे चौकशी केली असता त्यांनी अज्ञात दोन व्यक्तींनी पुढे बारशाचा कार्यक्रम सुरु आहे. तुम्हालाही साडी नेसवण्यात येणार आहे. तुमच्याजवळचे साहित्य या पिशवीत ठेवा, अशी बतावणी करुन त्यांना भुरळ घालून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम एका पिशवीत त्या दोघांनी घातली. अन् बोलण्याच्या नादात ते दोघे पिशवी घेऊन निघून गेले, असे सांगितले. त्या अनुषंगाने पतंगे यांनी त्या परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. परंतु कॅमेरे बंद असल्याने तेही हताश झाले.
शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या बीट अंमलदारास कामाचा ताण
शाहुपूरी पोलीस ठाण्यामध्ये काही कर्मचारी हे जादा काम करतात तर काही कर्मचारी कामच करत नाहीत याचेच बोलके उदाहरण बुधवारी सायंकाळी निदर्शनास आले. शाहुपूरी पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार भोसले हे डय़ुटीवर होते. त्यांच्यासमोर कामाचा मोठा व्याप होता. पोलीस ठाण्यात कामानिमित्ताने आलेल्यांची कामे करण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. म्हणून त्यांनी चव्हाण यांना माहिती देण्यास सांगितले. परंतु चव्हाण यांना सुद्धा अन्य काम लागले. विशेष म्हणजे शाहुपूरी पोलीस ठाण्यातले हे कर्मचारी बहुतेक इतर कर्मचाऱयांपेक्षा जास्त काम करत असावेत, अशीच चर्चा सुरु आहे.