प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील गोवळकोट रोड परिसरातील अल हाजी अपार्टमेंटमध्ये पुन्हा 13 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकाच इमारतीत 25 रूग्ण सापडल्याने या इमारतीला कोरोनाने विळखा घातल्याचे दिसून येत आहे. अनेकांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याच परिसरात अन्य तीन रूग्ण सापडले असल्याने हा भाग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच केतकी येथील एका चाकरमान्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने तालुक्याचा आकडा 141 झाला असून दीड शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी एका फार्मासिस्टसह त्याच्या शिक्षक पत्नीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या मुलीला व अन्य नातेवाईकांना लागण झाली. या दोघांच्या संपर्कात तब्बल 127 जण आले होते. त्यामुळे येथे रूग्ण संख्या वाढणार असे वाटत असतानाच फार्मासिस्टच्या मेडिकलमधील तरूण व तरूणीला कोरोना झाला. ही तरूण अल हाजी इमारतीत राहणारी आहे. या इमारतीत अनेक सदनिका असून लोकसंख्याही अधिक आहे. त्यामुळे तरूणीमुळे येथे आतापर्यंत 25 जण बाधित झाले आहेत, तर याच भागात राहणाऱया अन्य तिघांनाही कोरोना झाला आहे. या परिसरात आतापर्यंत 28जण सापडल्याने हा भाग बंद ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सध्या शहरातील विविध भागातील 50जण बाधित झाले आहेत. 70जणांचे नमुने घेण्यात आले आहेत, त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे शहरातील आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते हे सहकाऱयांसह संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी करत आहेत. यासाठी 13 प्रभागात कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बाधित भागीतील फवारणी व कचरा उचलण्यासाठी 2 पथके नेमण्यात आली आहेत.
केतकी-भागणेवाडी येथील तरूणालाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा तरूण 30 जून रोजी मुंबई-नालासोपारा येथून खाजगी वाहनाने येथे आले. तहसील कार्यालयात नोंदणी केल्यावर तो रिक्षाने गावात गेला. 4 जुलै रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने रिक्षाने कामथे येथे आला. प्राथमिक उपचार व नमुने घेतल्यावर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्याला 108 रूग्णवाहिकेने पेढांबे येथे आणण्यात आणून उपचार सुरू करण्यात आले आहेत. ज्या-ज्या भागात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्या भागातील आवश्यक तो परिसर आयासोलेट करण्यात आला आहे. प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव या उपाययोजना करण्यावर भर देत आहेत. तसेच आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.