कुटुंब, कर्मचाऱयांसह रूग्णांचा समावेश, वाघिवरेतील बाप-लेकीची रूग्णांत भर, तालुक्यातील बाधितांचा आकडा 19 वर
प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील मार्कंडी परिसरात सापडलेल्या कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात तब्बल 128 जण आल्याचे स्पष्ट झाले आहे. यात कुटुंबासह लोटेतील परशुराम कॉलेजमधील कर्मचारी, रूग्णांचा समावेश आहे. तसेच वाघिवरेतील बाप-लेकीमुळे रूग्णांच्या संख्येत भर पडली असून तालुक्यातील रूग्णांची संख्या 19वर पोहचली आहे. 44 जणांच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा असून अजून 58 जणांचे नमुने घेतले जाणार आहेत. दरम्यान, दोणवली येथील चाकरमान्याचा शुक्रवारी मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. मात्र शहरात एकही रूग्ण सापडला नव्हता. मात्र शहरातील मार्कंडीतील गोल्डन सॅण्ड इमारतीत राहणारा डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने तो शहरासह जिल्हय़ातील पहिला डॉक्टर बाधित ठरला आहे. त्यामुळे ही इमारत सील करण्यात आली असून काही भाग बफोरझोन म्हणून घोषित करत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. गुरूवारी त्याची पत्नी, मुले व आई-वडील यांचे नमुने घेण्यात आले आहेत. या डॉक्टरला नेमकी लागण कोठून झाली हे शोधण्याचे मोठे आव्हान आजही प्रशासनासमोर आहे. मात्र आतापर्यंत केलेल्या चौकशीत या डॉक्टरच्या संपर्कात 128 जण आल्याचे स्पष्ट झाले आहे. यात 5 कुटुंबिय, 28 कर्मचारी व इतर रूग्णांचा समावेश आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्या 28 कर्मचाऱयांचे नमुने घेतले जाणार आहेत.
वाघिवरेतील बाप-लेकीची भर
वाघिवरेतील एक तरूणी यापूर्वी बाधित असल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. असे असतानाच 16 मे रोजी दहिसर-मुंबई येथून आलेल्या बाप-लेकीची यात गुरूवारी भर पडली आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या 17 जणांचे नमुने घेतले जाणार आहेत. या गावातील रूग्णांची संख्या वाढत चालली असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोणवलीत चाकरमान्याचा मृत्यू
मुंबई काळाचौकी येथून 20 मे रोजी 57 वर्षीय चाकरमानी आला होता. त्याला गुरूवारी रात्री 11 वाजता पोट फुगण्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे मध्यरात्री 2.30 वाजता कामथे रूग्णालयात आणण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह गावात नेऊन मोजक्याच ग्रामस्थ व नातेवाईकांनी कोरोनाच्या धर्तीवर अंत्यसंस्कार केले. मृत्यू होण्यापूर्वी त्याचे नमुने घेण्यात आले होते. त्यामुळे अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र मृत्यूच्या पार्श्वभूमीवर त्याच्या 8 नातेवाईकांचे नमुने घेतले जाणार आहेत. मुंबई-अंधेरी येथे मृत झालेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या धामेलीतील 12जणांपैकी सहाजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता त्यांच्या संपर्कातील तब्बल 39 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. या सर्वांना सावर्डे-वहाळफाटा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच येथे अधिक रूग्ण सापडल्याने आरोग्य विभागाने विशेष लक्ष दिले असून सर्वेक्षण करण्याचे काम गतीने केले जात आहे.
भीती कायम, प्रशासन सज्ज
तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच अजूनही 44जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून 58 जणांचे नमुने घेतले जाणार आहेत. त्यामुळे आकडा वाढण्याची भीती कायम आहेत. मात्र येणाऱया परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, गटविकास अधिकारी सरिता पवार, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तालुका आरोग्याधिकारी डॉ. ज्योती यादव आदी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.