मुंबईतील आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचे आदेश, नागरिकांच्या सोयीच्या कामात राजकारण नको
प्रतिनिधी/ चिपळूण
नागरिकांच्या सोयीच्या कामात राजकारण नको. कायदेशीर बाबींची पूर्तता करून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तत्काळ सुरू करा, असे आदेश पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले. या कामाच्या विशेष तपासणीच्या खर्चास मंजुरी देण्यासाठी विशेष सभा घ्या, त्यातही मान्यता न मिळाल्यास आपण तीन लाख रूपये देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे या नाटय़गृहाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
2005 साली महापुराचा फटका बसल्यापासून सांस्कृतिक केंद्र गेली 15 वर्षे बंद आहे. त्यामुळे यासाठी सुमारे 8 कोटी रूपये खर्च करून नगर परिषद गेल्या काही वर्षापासून त्याची दुरूस्ती करीत आहे. आता या केंद्राचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. दरम्यान या कामाची वास्तू विशारदांकडून तांत्रिक तपासणी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे, तर दुसरीकडे त्यासाठी येणाऱया खर्चास नामंजुरी दिली आहे.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत ऍड. परब यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे सांस्कृतिक केंदाचे उद्घाटन होण्याच्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केंदाच्या कामाबाबतची माहिती मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याकडून त्यांनी जाणून घेतली. केंद्र सुरू होण्यासाठी नागरिकांचे दूरध्वनी येतात असे सांगत त्यांच्या सोयीसाठी असलेले हे केंद्र कायदेशीर बाबींची पूर्तता करून तत्काळ सुरू करा, असा आदेशच दिला. या बाबी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून जी मदत लागेल ती दिली जाईल, तसेच लवकरच उद्घाटन करण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन प्रयत्न करा, असा सल्लाही परब यांनी दिला.
यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाळ, राष्ट्रवादीच्या गटनेत्या वर्षा जागुष्टे, नगरसेवक मोहन मिरगल, शशिकांत मोदी, आशिष खातू, परिमल भोसले, शिवानी पवार, नुपूर बाचिम, रसिका देवळेकर, मुख्याधिकारी डॉ. विधाते, नगर अभियंता परेश पवार आदी उपस्थित होते.