प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील उक्ताड येथील पार्किंग झोनचे काम सुरू करण्यात आले असून सध्या त्याने वेग घेतला आहे. त्यामुळे ते लवकरच मार्गी लागणार असून पुढील वर्षी पार्किंगचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
शहरात पार्किंगअभावी दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी, यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेता सुमारे 76 लाख रूपये खर्च करून नगर परिषद उक्ताड येथे पार्किंग झोन साकारत आहे. मात्र त्याचे काम सुरू असतानाच अनेक अडचणी आल्या. त्यामुळे ठेकेदाराला कामाची गती राखता आलेली नाही. त्यातच या कामाचा दर्जा चांगला नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यातच मार्च महिन्यापासून सुरू असलेले कोरोनाचे संकट त्यामुळे हे काम आणखीनच अडचणीत सापडले. मात्र काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने काम करण्यास परवानगी दिल्याने केबीन व अन्य कामे करण्यात आली. सध्या सोलिंगचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे कामही पूर्ण होणार आहे. तसेच अन्य कामेही जोरात सुरू करण्यात आली आहेत. मात्र नियमानुसार जास्त कामगार कामास ठेवणे शक्य नसलयाने तसेच परप्रांतीय कामगारही गावाला गेल्याने कामाची गती वाढवणे शक्य होत नसल्याचे सांगितले जात आहे.
मुकादम यांच्या तक्रारीचे काय?
या कामाची मूळ निविदा 76 लाख 99 हजार 615 रूपयांची आहे. असे असताना मूळ अंदाजपत्रकात बदल करून कौन्सिल सभागृहाची मान्यता न घेता 24 लाख 95 हजार 615 रूपये वाढीव काम केल्याचे भासवून नगर परिषदेचे आर्थिक नुकसान केले जात आहे. नगर परिषद अधिनियम व स्थायी निर्देशातील तरतुदीनुसार मंजूर निविदा रक्कमेपेक्षा जास्तीत-जास्त 10 टक्क्यांपर्यंतच वाढीव खर्चास मंजुरी देता येते. मात्र वाढीव खर्च 35 ते 40 टक्के आहे. त्यामुळे वाढीव रक्कमेस सर्वसाधारण सभेत दिलेली मंजुरी नियमबाहय़ आहे. त्यामुळे हा ठराव रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याकडे केली आहे. त्यामुळे त्याचे पुढे काय झाले, याची माहिती मिळू शकली नाही.