प्रतिनिधी /चिपळूण :
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला चिपळुणात दुसऱया दिवशीही चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी सुरू असून अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसापासून जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आठवडय़ाचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. चिपळुणात दरदिवशी पाच ते दहा रूग्णांची भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यापारी भयभीत झाले आहेत. त्यामुळे रोगापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. काही मोजके भाजीवाल, फळविक्रेते, किराणा मालाचे व्यापारी यांनी दुकाने सुरू ठेवली आहेत. मात्र नागरिकच घराबाहेर पडत नसल्याने त्यांना दुकानांमध्ये शांत बसून रहावे लागत आहे.
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले असून तेथे वाहनचालकांची कसून चौकशी केली जात आहे. विनाकारण घराबाहेर पडल्याचे स्पष्ट होताच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असून याचा नागरिकांनी धसका घेतला आहे. तसेच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते हे शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.