प्रतिनिधी/ चिपळूण
गतवर्षीच्या महापुरात केलेल्या मदतीचे ऋण व्यक्त करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख उमेश सपकाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उभारलेला व वादग्रस्त ठरलेला भला मोठा बॅनर परवानगी संपताच शनिवारी रात्रीच काढण्यात आला. त्यामुळे शिवसेनेत सुरू झालेले बॅनर युध्द सध्यातरी थांबले आहे. मात्र नजीकच्या काळात ते किती पेटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गतवर्षीच्या महापुरात उद्ध्वस्त झालेले शहर उभे करण्यासाठी हजारो हात मदतीसाठी धावले होते. त्यात तत्कालिन नगरविकास मंत्री, शिवसेना नेते व सध्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे योगदान मोठे होते. त्यांच्यामुळे शहर उभे राहिले, अशा प्रतिक्रिया आजही उमटताना दिसतात. त्यामुळे सकपाळ यांनी शुक्रवारी सकाळी शहराच्या मध्यभागी कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुल परिसरात भला मोठा बॅनर उभारला. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी मंत्री यांचेदेखील छायाचित्रे होती. मात्र सध्या राज्यस्तरावर ठाकरे-शिंदे गटात मोठा राजकीय वाद सुरू असल्याने हा बॅनर वादग्रस्त ठरला.
बॅनर पाहून शिवसैनिकांचे पित्त खवळले. त्यामुळे तातडीची बैठक झाली. बैठकीनंतर रात्री 11 वाजता हा बॅनर शिवसैनिकांनी काढला. त्यामुळे वातावरण तंग झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी सकपाळ यांच्या गटाने त्याच जागी पुन्हा तसाच नवीन बॅनर उभारला. त्यामुळे वातावरण आणखीनच तापले. असे असताना विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी पत्रकार परिषद घेत शहरप्रमुख सकपाळ यांना ठणकावले तर सकपाळ यांनीही बैठक घेत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बॅनर युध्द पेटते की काय, असे वाटत होते. मात्र पोलिसांनी बॅनरसह आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवत युध्दाला थंड करण्याचा प्रयत्न केला.
नगर परिषदेनेही बॅनर उभारण्यासाठी परवानगी घेणाऱयांकडून योग्य ती प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून घेत शनिवारी रात्री 10 वाजेपर्यंत बॅनर काढण्याची मुदत दिली. त्यानुसार या मुदतीत हा बॅनर काढण्यात आला. त्यामुळे सध्यातरी हे बॅनर युध्द थांबले आहे. मात्र सकपाळ यांच्या या वर्तनाची पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत दखल घेण्यात आली असून जिल्हाप्रमुख सचिन कदम पुढील निर्णय देतील, असे बाळा कदम यांनी सांगितले. त्यामुळे सकपाळ यांच्यावर काय कारवाई होते, यावर या बॅनर युध्दाचा भडका अवलंबून असल्याचे शिवसैनिकांमधून बोलले जात आहे..