सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर यांची माहिती,
प्रतिनिधी/ चिपळूण
तालुक्यात 19 परवानाधारक सावकार आहेत. अनेक अटी घालून त्यांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र वाढत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या सर्वांना नोटीस देऊन खुलासा मागवला जाणार असल्याची माहिती चिपळूण सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चिपळूण तालुक्यात बाळासाहेब घाडगे, चांगदेव खंडजोडे, प्रमोद गोपाळ, अजय देवधर, प्रशांत देवळेकर, नितेश ओसवाल, तुषार आंबुर्ले, शिवेंद्र सुर्वे, रामचंद्र खंडजोडे, उदय देसाई, गणेश पानकर, आकाराम सातपुते, संभाजी यादव, प्रसाद वेल्हाळ, सोनिया सकपाळ, शिवाजी खंडजोडे, विकास मांडवकर, सुरेंद्र चिपळूणकर, विक्रमसिंग चौहान असे 19 अधिकृत सावकार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर यांनी दिली. चालू वर्षात अनेकांनी आपले परवाने नूतनीकरण केले आहेत तर काहींची प्रक्रिया सुरू आहे. परवाना देताना पोलिसांचा गुन्हा दाखल नसल्याचा दाखला, नगर परिषद, ग्रामपंचायतीचा दाखला, 3 वर्षांची रिटन फाईल, उलाढाल करणार असलेल्या बंकेचे पासबुक, 1 लाख रूपये खात्यात असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे घेतली जातात. तारण असल्यास वार्षिक 12 टक्के, तर तारण नसल्यास 15 टक्के व्याज घेण्याची त्यांना परवानगी आहे. कर्ज दिल्यावर कर्ज पावती, हप्ता घेतल्यावर वसुली पावती देणे बंधनकारक आहे. सावकारांना कार्यालये सुरू करायची असल्यास त्यावर त्यांचे नाव, परवाना क्रमांक लिहिणे गरजेचे आहे. या साऱया बाबींची पूर्तता होते की नाही याचा दरमहा आढावा घेतला जातो व ऑडीटही होते असही सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर यांनी सांगितले.
काही सावकारांबाबत वर्षभरापूर्वी तक्रारी आल्या होत्या. यावेळी तक्रारदार व सावकार यांना बोलावून चौकशी केल्यानंतर तक्रारदारांनी आपल्या तक्रारी मागे घेतल्याने पुढील कारवाई करता आली नव्हती. सध्या कोरोनाचा काळ असल्याने सावकारांच्या बैठका घेतानाही अडचणी येत असल्याचे बांगर यांनी सांगितले. नजीकच्या काळात तक्रारी वाढल्याने 19 जणाकडूनही खुलासा मागवणार आहोत. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवणार आहोत. नोटीसचे उत्तर आल्यावर त्यातही कोणी दोषी दिसून आल्यास त्यांच्यावरही योग्य कारवाई केली जाईल असे बांगर यांनी स्पष्ट केले.
पिळवणूक होणाऱयांनी तक्रारी कराव्यात
ज्यांनी अधिकृत किंवा अनधिकृत सावकारांकडून कर्ज घेतले आहे त्यांनी कर्ज व वसुली पावत्या त्या-त्या वेळी घेणे बंधनकारक आहे. सावकार पावत्या देत नसतील, जादा पैसे घेऊन पिळवणूक करत असतील तर त्यांच्या तक्रारी करा, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही बांगर यांनी सांगितले.
‘त्या’ तीन सावकारांच्या मागावर पोलीस!
चिपळुणात पैसे वसुलीसाठी एका महिलेला मारहाण करुन मानसिक व शारीरिक त्रास दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तीन सावकारांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांच्या मागावर आहेत. त्यासाठी पोलिसांनी तपास यंत्रणा गतीमान केली आहे. पूजा मिरगल, शिवा खंडजोडे, चांगदेव खंडजोडे उर्फ डिके (तिघेही चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद बिलकीस अब्दुलकरीम परकार यांनी दिली आहे.