प्रतिनिधी / चिपळूण
लॉकडाऊन काळात अडकलेल्या परप्रांतिय मजुरासाठी मध्यप्रदेशला जाण्यासाठी पनवेलहून रेल्वे सुटणार असल्याने त्यांच्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानकातून मंगळवारी 6 बसगाडय़ांचे नियोजन करण्यात आले होते. या बसगाडीतून तब्बल 132 मजुरांनी पनवेलपर्यंत नेण्यात आले.
तालुक्यात बांधकामासाठी मोठय़ा संख्येने दाखल झालेला मजूरवर्ग लॉकडाऊनमध्ये अडकल्याने त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी शासनस्तरावरुन नियोजनही करण्यात आले आहे. गावी जाणाऱया या मजुरांसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रियाही राबवण्यात आली होती. या मजुरांसाठी मंगळवारी सायंकाळी 6 वा. पनवेलहून मध्यप्रदेशला एक रेल्वे जात असल्याने त्यासाठी त्यांना पनवेलपर्यंत जाण्यासाठी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून मोफत 6 बसगाडय़ांचे नियोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी 8.30 वा. या बसगाडय़ा या मजुरांना घेऊन पनवेलला रवाना झाल्या. यावेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, आगार प्रमुख रणजित राजेशिर्के, दीपक चव्हाण, अनिल पाटील, आर. ए. जंगम आदी उपस्थित होते.