प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील मुरादपूर येथील आशा सेविकेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासन हादरले असून खेर्डी व मार्कडीतील आणखी दोघांना कोरोना झाला आहे. यामुळे तालुक्याचा आता 127वर पोहोचला आहे. रविवारी बऱया झालेल्या 8 जणांना घरी सोडण्यात आले.
फार्मासिस्ट, त्याची शिक्षक पत्नी, मेडिकलमधील कर्मचारी व खेड तालुक्यातील लोटे येथील सर्वात मोठय़ा कंपनीतील कर्मचाऱयांना झालेल्या लागणनंतर गेल्या काही दिवसांपासून येथे दरदिवशी मोठय़ा प्रमाणात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहेत. गोवळकोट रोड परिसरातील एकाच इमारतीत तब्बल 11 जणांना कोरोना झाला आहे. त्यामुळे येथे भीती निर्माण झाली आहे. रविवारी मुरादपूर येथील आशा सेविकेला लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. कारण या सेविकेच्या संपर्कात अनेकजण आले आहेत. त्यांची यादी बनवण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्याचे लवकरच नमुने घेतले जाणार आहेत. तसेच लोटे कंपनीतील तसेच खेर्डी-माळेवाडी येथील कर्मचाऱयाला लागण झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी त्याच्या आईलाही कोरोना झाल्याचे पुढे आले आहे.
तसेच मार्कंडीतील कंपनीतील कर्मचाऱयालाही कोरोना झाला आहे. या तिघांमुळे तालुक्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडाही 127 वर पोहोचला आहे. ज्या-ज्या भागात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्या भागातील आवश्यक तो परिसर आयसोलेट करण्यात आला आहे. तसेच प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. शहरात सर्व ठिकाणी फवारणी करण्यात येत असून आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पेढांबे येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱया बाधितांपैकी बऱया झालेल्या 8 जणांना रविवारी घरी सोडण्यात आले. यावेळी तहसीलदार सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यादव, डॉ. अमित बीडकर आदी उपस्थित होते.