गोवळकोट, कालुस्ते, मिरजोळी, चिवेली, दोणवलीत 25 बोटींनी हातपाटी -व्यावसायिकांकडून दिवस-रात्र वाळू उपसा
प्रतिनिधी/ चिपळूण
प्रशासकीय यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात गुंतली असल्याने व येथे अधूनमधून जोरदार पाऊस पडत असतानाही गेल्या काही दिवसांपासून गोवळकोट, कालुस्ते, मिरजोळी, चिवेली, दोणवली परिसरात मोठय़ा प्रमाणात हातपाटीने बेकायदा वाळू उत्खनन सुरू झाले आहे. 25 बोटींच्या माध्यमातून हे उत्खनन होत असून या वाळूची भरदिवसा तसेच रात्री व पहाटे वाहतूक होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शासनाच्या लिलावातून घेतलेल्या वाळूचीही उचल झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून डेझर व हातपाटीने वाळू उत्खनन करण्याला परवानगी नाही. मात्र लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचा भार सोसायचा कसा, असा प्रश्न व्यवासायिकांनी काही लोकप्रतिनिधींना विचारल्याने लोकप्रतिनिधींनी केलेल्या मध्यस्थीमुळे हा भार कमी करण्यासाठी प्रशासनाने मे महिन्यात मूकसंमत्ती दिली होती. याचा व्यावसायिक गैरफायदा घेऊ लागले. मोठय़ा प्रमाणात उत्खनन करण्याबरोबरच वाळूचे दरही वाढवण्यात आले. इतरवेळी 2 हजार 500 ते 3000 रूपये ब्रासने मिळणारी वाळू चोरीची असतानाही 4 हजार 500 रूपये ब्रासने विकली जात होती. या विरोधात ग्राहकांनी आवाज उठवल्यानंतर तसेच परप्रांतीय कामगारही गावाला गेल्याने अधिकाऱयांनी पुन्हा वाळू उत्खनन करायचे नाही, अशी तंबी दिली. त्यामुळे काही दिवस हे उत्खनन बंद होते. मात्र सध्या गोवळकोट, कालुस्ते, मिरजोळी, चिवेली, दोणवली परिसरात काही व्यावसायिक 25 बोटींच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात हातपाटीने बेकायदा वाळू उत्खनन करीत असून काही भागात भरदिवसा तर काही भागात रात्री व पहाटे वाहतूक केली जात आहे. या वाळूचा दर तर गगनाला भीडला असून 5000 हजार रूपये ब्रासने ती विकली जात आहे. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी असून अधिकाऱयांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात व्यस्त असल्याने त्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
लिलावातील वाळूची उचल
तहसील कार्यालयाने विविध कारणांमुळे शहरातील उक्ताड येथील शासकीय गोदाम परिसरात जप्त करून ठेवलेल्या 52 ब्रास वाळूचा काही दिवसांपूर्वी लिलाव करण्यात आला. या वाळूला प्रतीब्रास 5 हजार 500 रूपये इतका सोन्याचा भाव मिळाला. ती मन्सूर घारे यांनी घेतली. त्यानुसार सर्व प्रकारचे दर धरून झालेले सुमारे 2 लाख 75 हजार रूपये त्यांनी प्रांत कार्यालयात भरून या वाळूची सोमवारी उचल केली. मात्र त्यांनी ती किती रूपयांनी विकली, याची माहिती मिळू शकली नाही.