ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांसह लोकप्रतिनिधींची धावाधाव
प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर शहरातील भाजी आणि फळ विक्रेते दीपक फडतरे याचे कोरोनावर उपचार घेत असताना मंगळवारी रात्री निधन झाले. तो 39 वर्षाचा होता. शृंगारतळीतील कोविड रूग्णालयात अत्यवस्थ बनल्यानंतर त्याला चिपळुणातील रूग्णालयात आणले असता तिथे एकाही रूग्णालयात ऑक्सिजन बेड न मिळाल्याने दीपकचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला. त्याला ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांसह काही लोकप्रतिनिधींनी प्रचंड शर्थ केली.मात्र तोपर्यंत फारच उशिर झाला होता.
शहरात पहिल्यांदा रसवंती गृहावरील दीपक अशी त्याची ओळख होती. त्यानंतर एस. टी. स्टँडमध्ये त्यांने दुकान सुरु केले. त्याठिकाणीच शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंतची त्याची चांगली ओळख बनली होती. विद्यार्थ्यांचे पास बनवून देणे, एस. टी. वर काही वस्तू द्यायची असेल तर दीपकच्या दुकानात बिंधास्तपणे ठेवली जायची. त्यानंतर शहरामध्येच स्वतःचे भाजीचे दुकान सुरु केले. त्यालाही त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे भरभरून दाद मिळाली. गतवर्षापासून भाजीबरोबर फळ विक्रीही सुरू केली होती.
त्यांच्या घरातील एक सदस्य पॉझिटीव्ह आढळल्याने घरातील सर्वांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी अन्य सर्व निगेटीव्ह आढळले होते. त्यानंतर चार दिवसांनी दीपकला चक्कर आली म्हणून पुन्हा कोरोना तपासणी केल्यावर तो बाधित असल्याचे समोर आले. मधुमेह असल्याने डॉक्टरांनी त्याला ताबडतोब रूग्णालयात दाखल होण्यास सांगितले. शृंगारतळीतील कोविड रूग्णालयात तो दाखल झाला. उपचार सुरू असताना मंगळवारी त्याची तब्येत अचानक बिघडली. शरीरातील ऑक्सिजनची पातळी 50 पेक्षाही खाली येऊ लागली. यामुळे तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना चिपळूण येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. मात्र त्या रूग्णालयाने आमच्याकडे ऑक्सिजन बेड नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे ऑक्सिजन बेड शोधण्यासाठी धावाधाव सुरू झाली. यासाठी काही लोकप्रतिनिधींनी धावपळ सुरू केली. मात्र या शोधाशोधीत बराच वेळ गेला. शेवटी कामथे रूग्णालयात नेण्याचे ठरविण्यात आले. तोपर्यंत फारच उशिर झाला होता. अन्यठिकाणी ऑक्सिजन बेड शोधेपर्यंत दीपकचे निधन झाले. त्याच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, 3 बहिणी, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
तर दीपक वाचला असता…..
कोरोना बाधित झालेला दीपक फडतरे याच्यावर शृंगारतळी येथील खाजगी कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरु होते.त्या ठिकाणी मंगळवारी अचानक ऑक्सीजन पातळी कमी झाली. यामुळे जिह्यात ऑक्सीजन बेड उपलब्ध आहे का याची शोधाशोध सुरू होती.सर्व लोकप्रतिनिधींनीमार्फत याची शोधाशोध सुरू झाली. मात्र कोठेही उपलब्धता झाली नाही. अशावेळी चिपळूण येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये बेडची उपलब्धता मिळाली. हॉस्पिटलमधूनही बेड उपलब्ध आहे असे सांगण्यात आल.s यामुळे मंगळवारी सायंकाळी तातडीने शृंगारतळी येथून चिपळूणकडे त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायला गेले असता हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आम्ही आमच्या येथील रूग्णाला बेड दिला असे सांगून बेडची उपलब्धता नाही असे नातेवाईकांना सांगितले यामुळे पुन्हा बेडची शोधाशोध सुरू झाली. मात्र यात फार वेळ गेला आणि वाहनांमध्ये दीपकचे निधन झाले. शहरातील एखादय़ा रूग्णालयात दीपकला ऑक्सिजन बेड वेळीच मिळाला असता तर आमचा दीपक वाचला असता, असे दीपकच्या जवळच्या नातेवाईकांनी तरूण भारतशी बोलताना सांगितले
कामथे रूग्णालयात ऑक्सिजन बेड शिल्लक नाही
ऑक्सिजन अभावी गुहागरातील दीपक फडतरेचा मृत्यू झाल्याचे वृत्त पुढे आल्यानंतर यासंदर्भात कामथे येथील रूग्णालयातील उपलब्ध ऑक्सिजन बेडविषयी वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील डॉ. अजय सानप यांनी तरूण भारत शी बोलताना सांगितले की, कामथे येथील रूग्णालयात 72 रूग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. या ठिकाणी एकही ऑक्सिजन बेड शिल्लक नाही.