सध्या 52 जणांवर उपचार सुरू, आतापर्यंत 2715 जणांना लागण
प्रतिनिधी/ चिपळूण
तालुक्यात कोरोनाचे रूग्ण दिवसाला वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या 52 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 2715 जणांना लागण झाली आहे. त्यातील 2556 जण बरे झाले असून 107 जणांचा मृत्यू झाला आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचे संकट आले आहे. सुरूवातीला दोन महिने येथे तितकेसे रूग्ण नव्हते. मात्र मे महिन्यापासून रूग्णसंख्या झपाटय़ाने वाढली आणि तिने जिल्हय़ाला मागे टाकले. जिल्हय़ात सर्वात जास्त रूग्ण हे तालुक्यात होते. त्यानंतर विविध उपाययोजना करून प्रशासनाने त्यावर नियत्रंण मिळवले व तालुक्यातील बाधितांची संख्या कमीवर आणली. त्यामुळे गेले दोन महिने येथे रूग्ण तितक्याशा प्रमाणात मिळत नव्हते.
यामुळे प्रशासनासह नागरिक बिनधास्त झाले आणि त्यांनी कोरोनासाठी असलेले सर्व नियम धाब्यावर बसवले. प्रशासन तर इतके सुस्त झाले की त्यांनी नियम न पाळणाऱयांवर कारवाई न करता जणू त्यांना पाठीशीच घातले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तर सर्वांना नियम पायदळी तुडवले. तरीही प्रशासनाने कोणावरही कारवाई केली नाही. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. तालुक्यात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सध्या 52 जणांवर डेरवण, जिल्हा रूग्णालय, कामथेसह खासगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
कोरोना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2715 जणांना त्याची लागण झाली असून त्यातील 2556 जण बरे झाले आहेत, तर तब्बल 107 जणांचा यात मृत्यू झाला आहे. मृत्यूची आकडेवारीही जनतेची चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे आता नागरिकांनी नियम पाळण्याची, तर प्रशासनाने नियम मोडणाऱयांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनेकांकडून लपवालपवी
सध्या कोरोनाची लस घेण्यासाठी अनेकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र कोरोनाची लक्षणे असूनही तपासणी करून घेण्याकडे अनेकजण पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. अनेकजण साधा ताप-खोकला आहे असे सांगून आपल्या नियमित डॉक्टरांकडून घरच्या घरी उपचार करून घेताना दिसत आहेत. त्यामुळे रूग्णांचा खरा आकडा पुढे येताना दिसत नसून ही बाबही धोक्याची मानली जात आहे.