राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱयासह दोघांवर गुन्हा, एक अटकेत
चिपळूण
कराड येथे 15 बैल घेऊन जाणारा आयशर टेम्पो पोलिसांनी शुक्रवारी पहाटे 4.30 च्या सुमारास शहरातील बहाद्दूरशेखनाका येथे पकडला. हे बैल मार्गताम्हाने येथून आणले असून या प्रकरणी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱयासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटक झाली असून त्याला 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी बैलांसह 8 लाख 63 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादीचे रियाज खेरडकर (चिपळूण-खेर्डी) दाऊद महेबुब दफेदार (शनिवार पेठ, मुजावर कॉलनी, कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दफेदार याला अटक करण्यात आली आहे. या बाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रितम बाबाजीराव शिंदे (चिपळूण) यांनी दिली. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शिंदे हे शहरातील बहाद्दूरशेखनाका पहाटे गस्त घालत असताना कराडच्या दिशेने टेम्पो घेऊन जाणाऱया दफेदार याला थांबण्याचा इशारा केला. मात्र तो न थांबता टेम्पो काही अंतर पुढे घेऊन गेला. यामुळे शिंदे यांनी टेम्पोचा पाठलाग करण्यास सुरूवात केली असता दफेदारने हा टेम्पो बहाद्दूरशेख नाक्यानजीकच्या पुष्कर कॉम्प्लेक्स येथे थांबवला. त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे गस्त घालत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप वागणेकर यांनी टेम्पोची तपासणी केल्यानंतर हौद्यामध्ये कमी जागेत दाटीवाटीने 15 बैल दोरीने बांधलेल्या स्थितीत आढळून आले. हे सर्व बैल खेर्डी येथील रियाज खेरटकर यांच्या सांगण्यावरुन तालुक्यातील मार्गताम्हाने येथून टेम्पोत भरण्यात आल्याचे व ते कराड येथे कत्तलीच्या इराद्याने नेण्यात येत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. हे बैल ताब्यात घेऊन खेड तालुक्यातील लोटे येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहेत. या बाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वागणेकर करीत आहेत.
यापूर्वी खेर्डी हे गुरे वाहतुकीचे मुख्य केंद्र होते. मात्र या संदर्भात आतापर्यंत घडलेल्या विविध घटनांमुळे येथील सर्व व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे गुरे वाहतूक, कत्तल यासारखे कोणतेही गुन्हे घडले तरी या व्यावसायिकांची पोलिसांकडून कसून चौकशी होते. त्यामुळे येथून होणारी ही अवैध वाहतूक काही महिने थांबल्याचे सांगितले जात होते. यातूनच मार्गताम्हाने या नव्या केंद्राचा उदय झाला आहे. असे असताना पुन्हा या गुन्हय़ात खेरडकर याचे नाव आल्याने खेर्डीतूनही सूत्रे हलत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिसांना आता मार्गताम्हानेसह खेर्डी येथीलही व्यावसायिकांचा मागोवा काढावा लागणार आहे.