प्रतिनिधी / चिपळूण
तालुक्यातील पिंपळी येथील पॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन दोन मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची घटना गुरूवारी घडली. यातेल एकाचा मृतदेह तिसऱया दिवशी शनिवारी तर दुसऱया मित्राचा मृतदेह रविवारी फरशी पुलाजवळ सापडला. या बाबत चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिनेश जितेंद्र चव्हाण, गौरव पेडणेकर (दोघेही पिंपळी) अशी मृत्यू झालेल्या दोघा मित्रांची नावे आहेत. 1 एप्रिल रोजी दिनेश व गौरव पिंपळी पॅनॉल येथे पोहण्यासाठी गेले होते. मात्र ते पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. यावेळी दिनेश याची पिंपळी पॅनॉल या ठिकाणी केवळ सॅक, कपडे, मोबाईल, चप्पल सापडले. मात्र ते दिसून न आल्याने त्यांचा शोध घेतला असता ते कोठेही आढळले नाहीत. यानंतर या प्रकरणी दिनेशचा भाऊ रोहित चव्हाण याने दिनेशचे अपहरण झाल्याची तक्रार 2 एप्रिल रोजी चिपळूण पोलीस स्थानकात दिली. यावेळी दिनेश याचा शोध घेत असताना 3 एप्रिल रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास त्याचा मृतदेह खेर्डी येथील रेल्वे पुलाखाली वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला.
गौरव हा देखील पिंपळी पॅनॉलमध्ये दिनेशबरोबरच पोहण्यासाठी गेला होता आणि तोही वाशिष्ठी नदीत वाहून गेला. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी 11 च्या सुमारास फरशी पुलाजवळ आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नेंद करण्यात आली आहे.