अनेकांचे साहित्य केले जप्त, नजीकच्या मोठय़ा कारवाईची रंगीत तालीम सुरू, व्यावसायिकांनी घेतलाय धसका
प्रतिनिधी / चिपळूण
चिपळूण नगर परिषदेने गुरूवारी सायंकाळी शहरातील भोगाळेसह अन्य भागातील अतिक्रमणावर कारवाई केली. नजीकच्या काळात मोठी कारवाई केली जाणार असून त्याची ही रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे या कारवाईचा व्यावसायिकांनी धसका घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहराला अतिक्रमणाचा शाप लागला आहे. सध्यातरी अशा व्यावसायिकांनी कहर केला असून शहरातील रस्तेच काबीज केले आहेत. त्यामुळे भोगाळे, चिंचनाका, बाजारपेठ, पानगल्ली, मार्कंडी, बहादूरशेखनाका, पॉवरहाऊस आदी परिसरातून वाहने चालवणे सोडाच, साधे नागरिकांना चालणेही कठीण बनले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाते. मात्र त्यात काय अडचणी आहेत. हे डॉ. विधाते यांनी नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडल्या होत्या.
मात्र आता वाहनांच्या माध्यमातून होणारी विविध वस्तूंची विक्री व अन्य अतिक्रमणावर कारवाई करा अशा सूचना सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला केल्या आहेत. त्यानुसार मोठी कारवाई करण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरूवारी सायंकाळी डॉ. विधाते, कर निरीक्षक बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे संदेश टोपरे, विनायक सावंत, बापू साडविलकर यांनी अन्य कर्मचाऱयांच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली. या पथकाने अनेकांचे साहित्य जप्त केले.
लवकरच धडक कारवाई- डॉ. विधाते
याबाबत बोलताना मुख्याधिकारी डॉ. विधाते म्हणाले की, नगरसेवकांच्या सूचनेप्रमाणे लवकरच धडक कारवाई करण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. त्यामुळे अतिक्रमण हटाव कारवाईत आपले नुकसान करून घेण्यापेक्षा संबंधित व्यावसायिकांनी स्वतःहून ते काढून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.