घरातून घेतले ताब्यात, तीन दिवस पोलीस कोठडी
चिपळूण
शहरालगतच्या कळंबस्ते येथे पॅनरा बँक शाखेचे एटीएम चोरटय़ांनी फोडल्याचा प्रकार मंगळवारी घडल्यानंतर याप्रकरणी रविवारी पहाटे एकाला तालुक्यातील निरबाडे येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
संजय भिकाजी पवार (51, निरबाडे, चिपळूण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सतीशकुमार प्रमोदकुमार (36, शिवशक्ती प्लाझा, चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते येथील पॅनरा बँकेच्या शेजारी असलेल्या एटीएममध्ये चोरटय़ांनी प्रवेश करुन मोठय़ा लोखंडी रॉडने एटीएमचा प्रायमरी दरवाजा तोडून एटीएममधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला होता. या चोरी प्रकरणी पोलीस तपास करीत असताना पवार याने हे एटीएम फोडल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो सातत्याने चकवा देत होता. अखेर पवार हा रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास निरबाडे देऊवाडी येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी त्याच्या राहत्या घरालगत सापळा रचला असता तो त्यात सापडला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस नाईक संतोष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष भालेकर, पंकज पडेलकर आदींच्या डीबी पथकाने केली. पवार यास रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.