प्रतिनिधी/ चिपळूण
चिपळूण तालुक्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असतानाच गेल्या दोन दिवसांत पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयामधील 10 विद्यार्थ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रशासनाने कॉलेज, हॉस्टेल परिसर कन्टेंन्टमेंट झोन जाहीर करत संपर्कातील विद्यार्थ्यांची तपासणी सुरु केली आहे. दरम्यान, तालुक्याची रूग्णसंख्या 81 पर्यंत पोहचली आहे.
मंदार महाविद्यालयामध्ये आढळून आलेले कोरोना पॉझिटीव्ह विद्यार्थी फार्मसी आणि पॉलिटेक्निकमधील आहेत. 22 जानेवारीपासून सुरू झालेल्या या महाविद्यालयामध्ये स्थानिकांसह परराज्यातील विद्यार्थ्याची संख्या अधिक आहे. शनिवारी काही विद्यार्थ्यांना उलटी-जुलाबाचा त्रास झाल्यानंतर महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांची ऍन्टीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये तिघेजण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. रविवारी त्यांच्या संपर्कातील विद्यार्थ्यांची तपासणी केली असता त्यामध्ये आणखी सातजणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. एकूण दहा विद्यार्थ्याना कोरोनाची लागण झाल्यानंतर कॉलेजमधील अन्य विद्यार्थ्यांचीही तपासणी करण्यात आली. त्यांचा आरटीपीसीआर अहवाल दोन दिवसांत येणार आहे.
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी पॉझिटीव्ह आढळल्याची पहिलीच घटना असल्याने प्रशासन अलर्ट झाले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारपासून महाविद्यालयासह परिसर व हॉस्टेल कन्टेंन्टमेंट झोन जाहीर करत सील करण्यात आला. या महाविद्यालयाला आठवडाभरासाठी सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे महाविद्यालय प्रशासनाने ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले. तरीही खबरदारी म्हणून त्यांच्यावर कामथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी 10 दिवसांपूर्वीच बुलढाणा, अकोला आणि परभणी येथून आले असल्याचेही सांगण्यात आले.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून शहरासह तालुक्यात रूग्णसंख्या अचानकपणे वाढू लागली आहे. मार्चपासून आतापर्यंत तालुक्यातील रूग्णसंख्या 2 हजार 602 इतकी झाली आहे. त्यामध्ये सद्यस्थितीत कामथे येथे 81 जणांवर उपचार सुरू आहेत.